पावसापासून वंचित असलेले जगातील एकमेव गाव
कधीच पाऊस न पडणारी ठिकाणं कुठली असा प्रश्न विचारण्यात आल्यावर सर्वप्रथम वाळवंटी भाग डोळय़ासमोर येतो, परंतु प्रत्यक्षात असे नाही. जगात कधीच पाऊस न अनुभवलेले गाव एका सुंदर पर्वतावर वसलेले आहे. हे गाव येमेनची राजधानी सनाच्या पश्चिम दिशेला असलेल्या हरज क्षेत्रातील ‘अल-हुतैब’ आहे. अल-हुतैब गाव समुद्रसपाटीपासून 3,200 मीटर उंचीवर स्थित आहे. हा भाग अत्यंत उष्ण आहे, परंतु येथे हिवाळय़ात कडाक्याची थंडी असते. त्यावेळी दिवसादेखील उबदार कपडे घालावे लागतात. तर उन्हाळय़ात याच्या विरुद्ध स्थिती असते. येमेनच्या अल-हुतैब गावाची ख्याती दूरपर्यंत पसरली आहे. या गावाला अत्यंत उत्तमप्रकारे वसविण्यात आलेले असल्याने पर्यटकांची येथे मोठी वर्दळ असते. हे गाव एका पर्वतावर वसलेले आहे. या गावामधून खाली पहिल्यास दिसून येणारे दृश्य अत्यंत मोहक आहे. या गावात येमेनी समुदायाचे लोक राहतात. हे सुंदर गाव पर्वतावर वसलेले असल्याने ते नेहमीच ढगांच्या वर असते. दुसऱया शब्दांत सांगायचे असल्यास ढग या गावाखाली दिसून येतात. या गावाचे सौंदर्यच येथे कधीच पाऊस न पडण्याचे कारण आहे. ढग या गावातील तयार होतात आणि खालीच पाऊस पाडून मोकळे होतात. यामुळे या गावाला कधीच पावसाचा एक थेंबही लाभलेला नाही.
अल-हुतैब गाव हे ग्रामीण आणि शहरी वैशिष्टय़ांसह प्राचीन तसेच आधुनिक वास्तुकला दोघांनाही जोडते. या गावात बहुतांश लोक ‘अल-बोहरा’ किंवा ‘अल-मुकरता’ समुदायाशी संबंधित आहेत. त्यांना येमेनी समुदाय म्हटले जाते. विशिष्ट मुस्लीम संप्रदायाशी त्यांचा संबंध आहे, या संप्रदायाचे लोक मुंबईतही राहत होते. येमेनचे अल-हुतैब गाव पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक पोहोचत असतात. या गावातील घरांची ठेवण आणि स्वरुप लोकांना आकर्षित करणारे आहे. तर गावाखाली तयार होणारे ढग पाहण्यासाठी दरवर्षी अनेक लोक या गावात पोहोचत असतात.