नागालँडमधील झापामी गाव चर्चेत
नागालँडचे उच्चशिक्षण अन् आदिवासी व्यवहार मंत्री तेमजेन इम्ना अलाँग हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. स्वत:च्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ते नेहमी काहीतरी मजेशीर गोष्टी शेअर करतात. तेमजेन यांनी यावेळी शेअर केलेला व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओत झापामी गावातील सुंदर दृश्य दिसून येत आहे. हे गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून 53 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचा प्रवास तुम्हाला तुमच्या मुळांशी जोडतो आणि समृद्ध इतिहास तसेच संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देतो असे व्हिडिओ शेअर करत अलाँग यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
या व्हिडिओत स्थानिक पातळीवर वारसा संग्रहालयाच्या मार्फत इतिहास जतन करण्यात आल्याचे दिसून येते. व्हिलेज हेरिटेज म्युझियम केवळ स्थानिक लोकांच्या कलाकुसरीचे प्रदर्शन करत नाही तर दुसऱ्या महायुद्धातील अवशेषांचे जतन करते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अवशेष येथे पहायला मिळतात. झापामी गावाला भेट देणे एक अनोखा ऐतिहासिक अनुभव असून तो तुम्हाला स्वदेशातील समृद्ध इतिहास दर्शवित असल्याचे अलाँग यांनी म्हटले आहे.