Tarun Bharat

जगाला घडवणार आयुर्वेद सामर्थ्याचे दर्शन

पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : जागतिक आयुर्वेद परिषदेचे शानदार उद्घाटन : पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी समारोप

प्रतिनिधी / पणजी

आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर होत असलेला विस्तार आणि ज्या वेगाने आज आयुष प्रगती करत आहे त्या विकासाचे बीज 2014 मध्ये आयुष मंत्रालय स्थापनेच्या ऊपाने रोवलेल्या निर्णयात दडलेले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. आता आयुष औषध प्रणालीची परिणामकारकता आणि सामर्थ्य यांचे जागतिक स्तरावर दर्शन घडवणे हे आमचे ध्येय आणि आयुर्वेद परिषदेचा उद्देश आहे, असे ते पुढे म्हणाले.

पणजीत आयोजित 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासह विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

आयुर्वेद ही भारताची जगाला देणगी

’वसुधैव कुटुंबकम’ ही भावना बाळगणाऱ्या आमच्या पूर्वजांनी आयुर्वेदाची देणगी जगाला दिली. म्हणुनच आयुर्वेद ही केवळ एक औषधी पद्धत नसून ती आमची परंपरा आहे, असे पुढे बोलताना नाईक यांनी सांगितले. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. जगभरातील नागरिकांना आता त्याचा फायदा होत आहे. आयुर्वेद परिषदेचे हे उपक्रम संपूर्ण जगात अशा प्रकारच्या उपचार आणि निरामय आरोग्याच्या पारंपरिक प्रणालींचा प्रचार करतात, असे नाईक म्हणाले.

आयुर्वेद पर्यटनाला चालना देणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात, जागतिक आयुर्वेद परिषदेच्या  आयोजनाची संधी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. आयुष उपचारासाठी आयुष व्हिसा सुऊ करणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे आगामी उपक्रम केंद्र, राज्यातील आयुर्वेदिक पर्यटनाला चालना देईल, असे ते म्हणाले. गोव्यातील विद्यार्थ्यांना या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशात 50 टक्के आरक्षण मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

कोविड प्रतिबंध, उपचारात आयुषचे योगदान : कोटेचा

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी, गेल्या आठ वर्षांमध्ये आयुष क्षेत्राने प्रचंड वाढ नोंदवली आहे, असे नमूद केले. 2022 च्या अखेरपर्यंत आयुष क्षेत्र 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनामध्ये आयुषचे फार मोठे योगदान राहिले आहे. कोविड प्रतिबंध आणि उपचारांसाठी 89.9 टक्के भारतीय लोक आयुषवर अवलंबून राहिले होते, असे आयुष मंत्रालयाने केलेल्या प्रभाव मूल्यांकन अभ्यासात दिसून आले होते, असे कोटेचा पुढे म्हणाले.

भारत-जर्मनीतील आयुर्वेद संस्थांमध्ये सामंजस्य करार

यावेळी ‘आयुष्मान’ कॉमिक बुक मालिकेतील तिसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले. भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमधील प्रगत अभ्यासाला सहाय्य करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि जर्मनीच्या रोझेंबर्ग युरोपियन अकादमी ऑफ आयुर्वेद यांच्यात एका सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आयुर्वेद क्षेत्राला बळकटी देणे, त्याच्या भविष्याचा वेध घेणे, आयुर्वेद व्यापाराला चालना देणे, व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात संवाद, संपर्क आणि बौद्धिक आदानप्रदान घडवून आणण्यासाठी उद्योजक, चिकित्सक, पारंपरिक उपचार करणारे, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी, औषध उत्पादक, औषधी वनस्पतींचे उत्पादक आणि विपणन धोरणकार यांच्यासह सर्व भागधारकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आयुष उद्योगाची 2026 पर्यंत 15 टक्के वाढ शक्य

देशातील आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) क्षेत्राचा बाजारातील वाटा 2014 मधील 3 अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून आता 18 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. यात 6 पट एवढी वाढ झाली आहे. 2014 ते 2020 या काळात आयुष उद्योगाची वार्षिक वाढ 17 टक्के इतकी होती तर 2021 ते 2026 या काळात आयुषचा व्यापार 15 टक्के सीएजीआरने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत 53 देशांतील 400 परदेशी प्रतिनिधींसह 4500 हून अधिक व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. आरोग्य प्रदर्शनात 215 हून अधिक कंपन्या, आघाडीचे आयुर्वेद ब्रँड्स, औषध उत्पादक आणि आयुर्वेदाशी संबंधित शैक्षणिक आणि संशोधन आणि विकास संस्था सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी समारोप जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

खाण लीज लिलाव प्रक्रियेला शिरगाव कोमुनिदादचा पाठिंबा

Amit Kulkarni

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३२६ भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

Archana Banage

खाणी सुरु करा, अन्यथा अवलंबितांची जाबाबदारी घ्या

GAURESH SATTARKAR

प.विभाग बॉक्सिंग स्पर्धेत गोव्याने मिळविली 6 पदके

Amit Kulkarni

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

Amit Kulkarni

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू 14 रोजी गोव्यात

Omkar B