ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजपचे मुरजी पटेल विरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यात लढत होणार आहे. ठाकरे गटासह मविआला जमीन दाखविण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून, आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मविआवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे आहे. उद्धव ठाकरेंनी मविआचे सरकार असताना अडीच वर्षात काँग्रेसचे विचार स्वीकारण्यासोबतच काँग्रेस वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असताना त्या पक्षाला साथ दिली. आता त्यांच्या गटाने राहुल गांधी यांच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांची सेना बाळासाहेबांच्या विचारांपासून फार दूर गेल्याचे आम्ही घरोघर जाऊन मतदारांना सांगू.
अधिक वाचा : भाजप उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचा आक्षेप, उमेदवारी रद्द करण्याची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.