Tarun Bharat

सुवर्णजेत्या बॅडमिंटनपटूंचे जंगी स्वागत

Advertisements

पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, चिराग शेट्टी यांच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी

हैदराबाद / वृत्तसंस्था

पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, चिराग शेट्टी या दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या राष्ट्रकुलमधील देदीप्यमान यशानंतर हैदराबाद विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत यंदा भारतीय पथकाने लक्षवेधी कामगिरी साकारली. त्यानंतर दोन-एक दिवसात विविध टप्प्यात भारतीय खेळाडू मायदेशी परतत आहेत.

यंदा 11 दिवस चाललेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 61 पदके (22 सुवर्ण, 16 रौप्य व 23 कांस्य) पदकांची कमाई केली. यात कुस्तीत 6 सुवर्णपदकांसह सर्वाधिक 12 पदके जिंकली. वेटलिफ्टिंगमध्येही 10 पदकांवर आपली मोहोर उमटवली.

पदक जिंकून मायदेशी परतल्यानंतर शटलर चिराग शेट्टीने वर्ल्ड चॅम्पियनशिप हे आपले पुढील टार्गेट असेल, असे स्पष्ट केले. सात्विक रणकिरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने यंदा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे सुवर्ण जिंकले. सात्विक साईराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी इंग्लंडच्या सीन व्हेन्डी व बेन लेन यांचा 21-15, 21-13 अशा फरकाने पराभव केला होता.

‘पदक जिंकून मायदेशी परतण्याचा आनंद वेगळा असतो. मागील राष्ट्रकुल स्पर्धेत आम्ही वैयक्तिक गटात रौप्यपदकासह परतलो होतो आणि त्याचे सुवर्णपदकात रुपांतर करण्याचा निश्चय त्याचवेळी केला होता. हा निश्चय प्रत्यक्षात साकारता आला, याचा आम्हाला आनंद आहे. आता वर्ल्ड चॅम्पियनशिप हे आमचे पुढील टार्गेट असेल’, असे शेट्टी याप्रसंगी म्हणाला.

महिला गटातील आघाडीची सुपरस्टार पीव्ही सिंधूच्या स्वागतासाठी तिचे वडील विमानतळावर जातीने हजर राहिले. पीव्ही सिंधूने आपल्या कारकिर्दीत राष्ट्रकुल महिला एकेरीत प्रथमच सुवर्ण जिंकले. सिंधूने अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेलेला एकतर्फी पराभवाचा धक्का दिला. तिने 21-15, 21-13 अशा फरकाने विजय संपादन केला.

पुरुष एकेरीत श्रीकांतने कांस्यपदकाची कमाई केली. त्याने सिंगापूरच्या जिया हेंग तेह याचा 21-15, 21-18 अशा फरकाने पराभव केला. भारताने यंदा राष्ट्रकल स्पर्धेच्या इतिहासात चौथी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असून सर्वोत्तम कामगिरी दिल्ली राष्ट्रकुलमध्ये नोंद आहे. त्यावेळी 2010 मध्ये भारताने 101 पदकांची लयलूट केली होती. अर्थात, यंदा नेमबाजीचा समावेश नसतानाही 61 पदके जिंकणे स्वागतार्ह ठरले. भारताने नेमबाजीत राष्ट्रकुल इतिहासात 135 पदके जिंकली असून यामुळे नेमबाजीची उणीव जाणवणे साहजिक होते.

यंदा भारतीय पथकाने कुस्तीत 12 पदके जिंकली आणि हे कोणत्याही एकाच खेळातील सर्वात लक्षवेधी यश ठरले. भारताने सहभाग घेतलेल्या प्रत्येक कॅटेगरीत पदक जिंकले, हे वैशिष्टय़पूर्ण होते. बजरंग पुनिया, रवि दहिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट, नवीन यांनी 6 सुवर्ण, अंशू मलिकने एकमेव रौप्य तर दिव्या काकरण, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, दीपक नेहरा यांनी कांस्यपदकांची कमाई केली.

ऑस्ट्रेलियाने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 178 पदके (67 सुवर्ण, 57 रौप्य, 54 कांस्य) जिंकली तर यजमान इंग्लंडने 175 पदकांसह (56 सुवर्ण, 65 रौप्य व 53 कांस्य) दुसरे स्थान प्राप्त केले. दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत संपन्न झालेल्या यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय ऍथलिट्सनी एकूण 16 विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता.

**EDS: HANDOUT PHOTO MADE AVAILABLE FROM SAI ON WEDNESDAY, AUG. 10, 2022** New Delhi: Commonwealth Games 2022 Silver medallists Indian men’s hockey team being welcomed upon their arrival at Indira Gandhi International Airport, in New Delhi. (PTI Photo)(PTI08_10_2022_000022B)

भारतीय पुरुष हॉकी संघाचेही जोरदार स्वागत

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकणाऱया भारतीय पुरुष हॉकी संघाचेही बुधवारी दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-0 असा एकतर्फी फडशा पाडला होता. ऑस्ट्रेलियातर्फे ब्लेक गोव्हर्स (9 वे मिनिट), नॅथन एफ्रम्स (14 व 42), जेकब अँडरसन (22 व 27), टॉम विकहॅम (26) व फ्लिन ऑगिल्वी (46 वे मिनिट) यांनी गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला होता.

वास्तविक, अंतिम लढतीत दाखल होण्यापूर्वी भारताने साखळी फेरीत जोरदार घोडदौड साकारली होती. घानाचा 11-0 असा फडशा पाडल्यानंतर इंग्लंडविरुद्ध 4-4 बरोबरी, कॅनडाविरुद्ध 8-0 फरकाने एकतर्फी विजय, वेल्सविरुद्ध 4-1 फरकाने विजय अशी भारताने दर्जेदार कामगिरी केली. त्यानंतर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला 3-2 अशा फरकाने धूळ चारली. मात्र, स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या या घोडदौडीला ऑस्ट्रेलियाने सहजपणे ब्रेक लावला.

2018 गोल्डकोस्ट स्पर्धेच्या तुलनेत भारताचे यंदाचे रौप्यपदक लक्षवेधी ठरले. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. मात्र, त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत पुन्हा एकदा अपयश पदरी आल्यानंतर चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

बुधवारी दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगने पदक जिंकता आल्याचा आनंद व्यक्त केला. ‘यंदा रौप्य जिंकता आले, त्याचा मला आनंद आहे. आम्ही 2018 मध्ये पदक जिंकू शकलो नव्हतो. पण, यंदा त्याची भरपाई करता आली’, अशी प्रतिक्रिया त्याने नोंदवली. पीआर श्रीजेश, हरमनप्रीत सिंग व अन्य सहकाऱयांचे योगदान महत्त्वाचे होते, असेही तो म्हणाला. भारतीय हॉकी खेळाडू यानंतर 10 ते 15 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार असून प्रो लीग व हॉकी वर्ल्डकपच्या तयारीला आता सुरुवात होईल.

उत्तर प्रदेश सरकार जेत्यांचा गौरव करणार

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकणाऱया राज्यातील 8 ऍथलिट्सचा उत्तर प्रदेश राज्य सरकारतर्फे गौरव केला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी ट्वीटरवर याची घोषणा केली.

‘राष्ट्रकुलमध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या ऍथलिट्सचा यथोचित गौरव केला जाईल. शिवाय, पदक जिंकणाऱया राज्यातील ऍथलिट्सना प्रशासकीय सेवेत सामावून घेतले जाईल. तसेच अन्य सेवासवलती दिल्या जातील’, असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार, राष्ट्रकुल सुवर्णजेत्यांना 1 कोटी रुपये, रौप्यजेत्यांना 75 लाख रुपये व कांस्यजेत्यांना 50 लाख रुपयांचे इनाम प्रदान केले जाणार आहे, असे  अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सेहगल यांनी नमूद केले. राज्यातील सर्व पदकजेत्यांना गॅझेटेड ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल, याचाही त्यांनी उल्लेख केला. सदर गौरव सोहळा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता चर्चेत आहे.

उत्तर प्रदेशमधील राष्ट्रकुल पदकजेते ऍथलिट

प्रियांका गोस्वामी (10 किमी रेस वॉकमध्ये रौप्य), मीरतची दीप्ती शर्मा, बिजनोरची मेघना सिंग (महिला क्रिकेटमध्ये रौप्य), ललित उपाध्याय-वाराणसी (हॉकीमध्ये रौप्य)

विजय कुमार यादव-वाराणसी, दिव्या काकरण-मुझफ्फरनगर, अन्नू रानी-मीरत, वंदना कटारिया यांना अनुक्रमे ज्युडो, कुस्ती, भालाफेक व महिला हॉकीत कांस्य.

राज्यातील अन्य सहभागी खेळाडू ः सीमा पुनिया-मीरत, पूनम यादव, पूर्णिमा यादव (वेटलिफ्ंिटग), रोहित यादव-जौनपूर, सरिता यादव-संबल.

भारताची खेळनिहाय पदके

क्रीडा प्रकार / सुवर्ण / रौप्य / कांस्य

ऍथलेटिक्स / 1 / 4 / 3 / 8

बॅडमिंटन / 3 / 1 / 2 / 6

मुष्टियुद्ध / 3 / 1 / 3 / 7

क्रिकेट / – / 1 / – / 1

हॉकी / – / 1 / 1 / 2

ज्युडो / – / 2 / 1 / 3

लॉन बॉल / 1 / 1 / – / 2

पॅरा पॉवरलिफ्टिंग / 1 / – / – / 1

स्क्वॅश / – / – / 2 / 2

टेबलटेनिस / 4 / 1 / 2 / 7

वेटलिफ्ंिटग / 3 / 3 / 4 / 10

कुस्ती / 6 / 1 / 5 / 12

राज्यनिहाय राष्ट्रकुल पदकजेते (वैयक्तिक व सांघिक)

राज्य / जिंकलेली पदके

हरियाणा / 27

पंजाब / 20

महाराष्ट्र / 8

आंध्र प्रदेश / 8

झारखंड / 8

उत्तर प्रदेश / 7

केरळ / 7

तामिळनाडू / 7

तेलंगण / 6

मणिपूर / 5

दिल्ली / 4

गुजरात / 4

उत्तराखंड / 4

ओडिशा / 3

कर्नाटक / 3

बंगाल / 3

मिझोराम / 2

मध्य प्रदेश / 2

हिमाचल प्रदेश / 2

छत्तीसगढ / 1

आसाम / 1.

Related Stories

झारखंडमधील ऍथलिटवर भाजी विकण्याची वेळ

Patil_p

गुरुराजा पुजारीला 61 किलो वजनगटात कांस्य

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघटी-20 मानांकनात तिसरा

Patil_p

लॉकडाऊनदरम्यान नाडाची 25 क्रीडापटूंना नोटीस

Patil_p

चेल्सीचा मँचेस्टर सिटीला धक्का

Patil_p

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली होम क्वारंटाइन; भाऊ स्नेहाशीष यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!