12 वर्षीय मुलीचे अनोखे इनोव्हेशन
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात राहणाऱया 12 वर्षीय मेडिसन चेकेट्सने अत्यंत कमी वयात एक असे इनोव्हेशन करून दाखविले आहे, जे सिंगल युज प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. सिंगल युज प्लास्टिकमुळे सर्वाधिक प्रदूषण पाणी आणि जलस्रोतांमध्ये होते. चेकेट्सने अशी पाण्याची बाटली तयार केली आहे, जी पाणी संपल्यावर फेकण्याऐवजी खाता येणार आहे.
स्मिथसोनियन नियतकालिकाच्या अहवालानुसार मेडिसन दरवर्षी सुटीच्या काळात कॅलिफोर्नियातील एस्कॉनडीडो समुद्रकिनाऱयावर जायची, समुद्रकिनाऱयावर आणि परिसरात तिला प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा पाहून चेकेट्सला मोठे दुःख वाटायचे. याचमुळे तिने प्लास्टिक कचरा दूर करण्यासाठी तोडगा काढण्याचा निश्चय केला आणि प्लास्टिक प्रदूषणावर संशोधन सुरू केले. मग तिने ‘इको-हीरो’ खकल्पावर काम सुरू केले.
मेडिसनने जिलेटिनच्या वापराद्वारे खाण्यायोग्य बाटल्या तयार केल्या, यात पाणीही साठविले जाऊ शकते. मेडिसन चेकेट्सच्या या प्रकल्पाला बहुचर्चित स्टेम फील्ड स्पर्धा ब्रॉडकॉम मास्टर्स कॉम्पिटिशन 2022 मध्ये पहिला क्रमांक मिळाला. आता ती ‘ईको-हीरो’ प्रकल्पासह राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे. चेकेट्स ही ईगल माउंटेन स्कुलची विद्यार्थिनी आहे.


दरवर्षी 300 कोटी बाटल्यांचा वापर
प्रारंभिक संशोधनात चेकेट्सला पाण्याच्या बाटल्यांना सिंगल युजचा विचार डोळय़ासमोर ठेवत डिझाइन करण्यात येत असल्याचे आढळून आले. म्हणजेच एकदा वापरल्यावर ही बाटली फेकून द्यावी लागते आणि यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असते. एका अनुमानानुसार अमेरिकेत दरवर्षी सुमारे 300 कोटी पाण्याच्या बाटल्यांचा वापर होतो, यामुळे मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यांच्यावर व्यापक स्तरावर रिसायकलिंग शक्य नसते. फेकण्यात आल्यावर या प्लास्टिकच्या बाटल्या समुद्रात पोहोचतात. एका अनुमानानुसार दरवर्षी प्लास्टिक कचऱयाचे 5.25 ट्रिलियनपेक्षा अधिक तुकडे समुद्रात फैलावत असतात.
संशोधन प्रारंभिक अवस्थेत
प्लास्टिक कचऱयामुळे होणारे प्रदूषण सागरी अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवत आहे. सागरी जीवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. सागरी जीव प्लास्टिक कचरा गिळत असल्याने त्यांच्या प्रकृतीला नुकसान पोहोचत आहे. संशोधनानंतर चेकेट्सला जेलद्वारे तयार आच्छादनात द्रव पदार्थ झेलण्याची क्षमता असल्याचे आढळून आले. स्वतःच्या इनोव्हेशनमध्ये तिने याचाच वापर केला आहे. जिलेटिन मेम्बेनद्वारे तयार या बाटलीत एका कपापेक्षा कमी पाणी ठेवले जाऊ शकते. याच्या एका युनिटच्या निर्मितीचा खर्च सुमारे 100 रुपये इतका आहे.