विक्रेते, व्यापारी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा : खरेदी-विक्रीला सुरुवात
वार्ताहर/ अगसगे
लम्पीच्या प्रादुर्भावानंतर शनिवारी प्रथमच एपीएमसीमध्ये जनावरांचा आठवडी बाजार बहरला. मागील आठवड्यापासून एपीएमसीतील मुख्य जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी हा बाजार भरवला जात आहे. त्यामुळे विक्रेते, व्यापारी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय या बरोबर खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उलाढाल देखील हळुहळु वाढू लागली आहे.
मागील पाच महिन्यापासून लंम्पीच्या रोगामुळे जनावरांचा बाजार बंद होता. यामुळे व्यापारी, दलाल यांची उपासमार झाली होती. कारण यांचा उदरनिर्वाह जनावरांच्या दलालीवरच अवलंबून असतो. मात्र मागील महिन्यापासून स्व:इच्छेने एपीएमसी भाजी मार्केटच्या प्रवेश द्वारासमोर म्हैस जानावरांचा किरकोळ बाजार भरवला जात असे. रितसर बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले होते. या विषयी प्रशासनाने दखल घेऊन केवळ म्हैस जनावरांच्या बाजारास परवानगी मागील आठवड्यापासून देण्यात आली आहे. यामुळे जनावरांचा आठवडी बाजार पूर्ववत झाला आहे. मात्र अद्याप गाय, बैलाच्या बाजारास रितसर परवानगी मिळाली नाही. त्यामुळे गाय व बैलांचा बाजार केंव्हा सुरु होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एपीएमसी येथील आठवडी बाजारात संकरीत गायी, म्हशी, बैलाची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे उलाढाल देखील लाखो रुपयांच्या घरात असते. मात्र मागील दोन वर्षात कोरोना व लंम्पीमुळे बाजारावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे उलाढाल देखील थांबली होती. परिणामी दलाल, विक्रेते, शेतकरी अडचणीत सापडले होते. लंम्पीचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने जनावरांच्या बाजार हळुहळु पूर्ववत होत आहे.
गायी, बैलाचा बाजार केव्हा
सध्या शेतामधील कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना बैलाची आवश्यकता असते. तर काही शेतकऱ्यांना गायी खरेदी-विक्री करायचे असते. मात्र अद्याप गायी, बैलाच्या बाजाराला शासनाने परवानगी नाकरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तरी गायी, बैलाच्या बाजाराला देखील प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी, दलाल, व्यापाऱ्यातून होत आहे.
म्हैस खरेदी-विक्रीसाठी रितसर परवानगी
द•ाr, हुक्केरी, संकेश्वर, बेळगाव या ठिकाण म्हैस जनावरांच्या बाजाराला प्रशासनाने हिरवा कंदिल दिला आहे. आमचे जनावरांचे युनियन आहे. काही अटी घालून जिल्हा प्रशासनाने आम्हाला म्हैस खरेदी-विक्रीसाठी रितसर परवानगी दिली आहे. पुढील महिन्यात गायी, बैलाच्या बाजाराला परवानगी देण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. शनिवारी म्हैस जनावरांच्या बाजाराला प्रतीसाद वाढला असून यावेळी सुमारे 200 म्हशी विक्रीसाठी आल्या असून यामध्ये पंढरपुरी, मुरा, जवारी मिक्स, म्हशी बाजारात आल्या होत्या व सुमारे 60 हजार पासून 90 हजार पर्यंत जनावरांची विक्री झाली आहे, अशी माहिती जनावरांचे व्यापारी संदीप कुंडेकर यांनी दिली.