वृत्तसंस्था/ मँचेस्टर (ब्रिटन)
युफाच्या युरोपा लिग क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने ओमोनिया निकोसियाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल मँचेस्टर युनायटेड संघातील स्कॉट मॅक्टॉमिनेने स्टॉपेज टाईममध्ये नोंदविला. सामन्याच्या पूर्वार्धात मँचेस्टर युनायटेड संघातील अव्वल फुटबॉलपटू रॅशफोर्ड तसेच पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो तसेच कॅसमिरो यांचे अनेक हल्ले ओमोनियाच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने परतावून लावले. रोनाल्डोने दोनवेळा ओमोनियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण त्याचे फटके गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने मँचेस्टरला आपले खाते उघडता आले नाही. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 9 गुण मिळविले असून आता हा संघ रियल सोसिदादपेक्षा 3 गुणांनी पिछाडीवर आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात रियल सोसिदादने शेरिफचा 3-0 असा पराभव करून पूर्ण गुण वसूल केले. मँचेस्टर युनायटेडच्या मॅक्टॉमिनेने 93 व्या मिनिटाला हा निर्णायक गोल नोंदविला.