बेळगाव-चोर्ला रोडवरील कुसमळीनजीक दुर्घटना : पाच जण जखमी, चारधाम यात्रेला जाताना काळाचा घाला
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-चोर्ला रोडवरील कुसमळीजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या कार अपघातात कंग्राळ गल्ली येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. बेळगावहून चारधाम यात्रेसाठी जाताना ही घटना घडली आहे.
चंद्रकला चंद्रकांत कंग्राळकर (वय 60, रा. कंग्राळ गल्ली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चंद्रकला यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सदाशिवनगर स्मशानभूमी येथे रक्षाविसर्जन होणार आहे.
या अपघातात चंद्रकांत ओमाण्णा कंग्राळकर (वय 65), मिखाईल अतुल तोरणेकर (वय 10), अतुल शशिराव तोरणेकर (वय 41), स्फूर्ती मदनकुमार भैरप्पण्णावर (वय 26), आकाश रामचंद्र मुचंडी (वय 27, सर्व रा. बेळगाव) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कंग्राळ गल्ली येथील पाच कुटुंबीय चार कारमधून चारधाम यात्रेसाठी निघाले होते. गोव्यापर्यंत कारमधून प्रवास करून रात्री ते विमानाने जाणार होते. गोव्याला जाताना कुसमळीजवळ झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या चंद्रकला यांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करीत आहेत.