शिग्गीहळ्ळी येथील घटना : आठ जण जखमी
प्रतिनिधी /बेळगाव
ऊसवाहू ट्रॅक्टर घरावर उलटून शिग्गीहळ्ळी के. एस., ता. बैलहोंगल येथे रविवारी घडलेल्या अपघातात उसाच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य आठ जण जखमी झाले असून यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
मरिकट्टीहून ऊस घेऊन साखर कारखान्याकडे जाताना अज्जप्पा बडीगेर यांच्या घरावर ऊसवाहू ट्रॅक्टर उलटला. या घटनेत पुलारकोप्प येथील गंगव्वा कम्मार (वय 57) या महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक पी. व्ही. सालीमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व जखमींना इस्पितळात हलविले.
मारुती निंगाप्पा बडीगेर (वय 55), गुलाबव्वा लक्ष्मण बडीगेर (वय 65), शांतव्वा मारुती बडीगेर (वय 55), पूजा बसवराज बडीगेर (वय 21), बसवराज मारुती बडीगेर (वय 28), कावेरी अज्जप्पा बडीगेर (वय 18), शोभा नागप्पा कम्मार (वय 42), प्रणंत बसवराज बडीगेर (वय 3) अशी जखमींची नावे आहेत.
सहा जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून दोघा जणांवर हिरेबागेवाडी येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. ऊसवाहू ट्रॅक्टर वळवताना शेडवजा घरावर ट्रॅक्टर उलटून ही घटना घडली असून छताखाली सापडून सहा बकऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बैलहोंगल पोलीस पुढील तपास करीत आहेत.