उंब्रज / प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील वनवासमाची येथे दगडाने ठेचून व गळा आवळून महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. लता मधूकर चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जळण आणायला जंगलात गेल्यावर संशयिताने डाव साधत महिलेचा खून केल्याचे समोर आले. दरम्यान पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून संशयिताचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, लता चव्हाण या मंगळवारी दुपारी जळण आणायला गावाशेजारी जंगलात गेल्या होत्या. त्यांची मुले शेणोली येथे अकलाईदेवी मंदीरात गेली होती. मुले घरी परत आल्यावर त्यांनी आईचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान गावातील काही लोकांनी लता यांना जळण आणायला जाताना पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता लता यांचा निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात लता यांचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. अत्यंत निर्घृण पद्धतीने लता यांचा खून केला असून, संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी छपासत्र सुरू केले आहे.