जेवणासाठी देखील उठत नाही
स्लीपिंग ब्युटी केवळ कहाण्यांमध्ये असतात असे मानले जाते. परंतु एक महिला दिवसातील 18 ते 22 तासांपर्यंत केवळ झोपून असते. हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही या महिलेचा दिनक्रम आता असाच झाला आहे. रियल लाइफ स्लीपिंग ब्युटी जोआना कॉक्सचा दिवसातील मोठा हिस्सा केवळ झोपण्यातच संपतो. 38 वर्षीय जोआना एकदा तर झोपल्यावर थेट 4 दिवसांनी जागी झाली होती. न खातापिता झोपून 4 दिवस कसे संपले हेच तिला कळले नव्हते. या प्रचंड झोपेमागे तिचा अजब आजार कारणीभूत आहे. हा आजार तिला फारवेळ जागं राहू देत नाही. जोआना कॉक्स आयडोपॅथिक हायपरसोम्निया या डिसऑर्डरमुळे दिवसातील 22 तासांपर्यंत झोप घेते. ही दुर्लभ स्थिती फारच कमी लोकांमध्ये आढळून येते. जोआनाला स्वतःच्या झोपेवर नियंत्रण ठेवता येत नाही. जोआना कुठेही झोपी जात असते. 2 मुलांची आई असलेली जोआना जेवण करण्यासाठी देखील अत्यंत प्रयत्नपूर्वक जागी होत असते. अशा स्थितीत प्रोटीन शेक आणि रेडी टू ईट फूडवर ती जगत आहे.
स्मरणशक्ती होतेय कमजोर
तिचा मेंदू बहुतांश वेळ झोपेत सुस्त राहत असल्याने तिच्या स्मरणशक्तीवरही प्रभाव पडत आहे. जागण्याचा प्रयत्न केल्यावर तिला अजब भास होऊ लागतात. ऑक्टोबर 2021 मध्ये तिला स्वतःच्या आजाराबद्दल कळले होते. या आजाराने माझे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मी कुठलेच काम करू शकत नाही, वाहन देखील चालविता येत नाही तसेच कुटुंबासोबत वेळ घालविता येत नाही. अनेक थेरपी आणि औषधांनंतर आतापर्यंत केवळ एक 12 तासांपर्यंत जागी राहू शकले होते असे तिने सांगितले आहे.