ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जादूटोण्यासाठी 27 वर्षीय महिलेचं मासिक पाळीचं रक्त विकल्याचा किळसवाणा प्रकार बीडमधून समोर आला आहे. सासरच्या मंडळींनीच हे कृत्य केले असून, याप्रकरणी महिलेचा पती, सासू, सासरे, दीर, भाचा (रा. बीड) यांच्याविरुद्ध पुण्यातील विश्रांतवाडी पोलिसात अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला आहे. तिचे माहेर विश्रांतवाडी येथे आहे. विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा या गावात पतीच्या घरी राहत होती. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करण्यास सुरूवात केली होती. महिलेच्या मासिक पाळीदरम्यान तिचे हातपाय बांधून मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून ते 50 हजारात जादूटोण्यासाठी विकलं. महिलेच्या दिराच्या सांगण्यावरुन 2019 पासून हा प्रकार सुरू होता. या छळामुळे पीडित महिला माहेरी निघून आली. सर्व हकिकत तिने आपल्या आईवडिलांना सांगितली. यानंतर पीडितेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आहे. हे प्रकरण आता तपासासाठी बीड पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : RTE च्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनापूर्वीचे शुल्क