प्रतिनिधी/ खेड
शहरातील डाकबंगला परिसरातील एका भंगार व्यावसायिकाच्या गोदामाममध्ये सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. छोटू ( रा. उत्तरप्रदेश ) असे मृत कामगाराचे नाव आहे. भर वस्तीत घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. भंगारात आलेले साहित्य गॅस कटरने कट करत असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
डाकबंगला परिसरातील वैश्य भवन समोरील मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून उघडय़ावरच भंगार व्यवसाय सुरू आहे. याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीच खबरदारी न घेताच भर वस्तीत येथे भंगार व्यवसाय सुरू आहे. या भंगार गोदामामध्ये कामगार ड्रम गॅसकटरने कट करत असताना ड्रममध्ये गॅस तयार होऊन अचानक स्फोट झाला. लोकवस्तीतच घडलेल्या स्फोटाने नजीकचे रहिवासी चांगलेच हादरले
हा स्फोट इतका भीषण होता की,कामगाराचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पसरून गॅस कटरचे पाईपही पूर्णतःवितळले.या ड्रममध्ये रसायन होते. याचमुळे स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. घटनेची खबर मिळताच पोलीस यंत्रणा व मदतकर्ते तातडीने घटनास्थळी पोहचले. स्फोटामुळे लागलेली आग स्थानिक नागरिकांनी आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
भर वस्तीतच उघडय़ावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना न केल्यामुळेच एका कामगारास हकनाक प्राणस मुकावे लागले आहे. हा कामगार काही दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेश येथून येथे आल्याचे पुढे आले आहे. लोकवस्तीतच सुरू असलेल्या या भंगार व्यवसायाला परवानगी होती की नाही, हेही तपासणे गरजेचे बनले आहे. या घटनेनंतर पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.