पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल
कवठेमहंकाळ/प्रतिनिधी
कवठेमहंकाळ तालुक्यातील जांभुळवाडी येथे रस्त्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याबद्दल पाच जणांच्या विरुद्ध कवठेमहंकाळ पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बिरा आण्णासो दाइंगडे (वय वर्ष २८ राहणार जांभुळवाडी तालुका कवठेमंकाळ) यांचा भाऊ अंकुश हा दुपारच्या सुमारास शेतातून कणसे घेऊन मोटरसायकल वरून येत असता आरोपी मोहन लक्ष्मण दाइंगडे, रमेश दाइंगडे, लक्ष्मण दाइंगडे, वसंत धोंडीबा दाइंगडे, बबलू शंकर दाइंगडे हे सर्व राहणार जांभूळवाडी यांनी त्यास अडवून हा आमचा रस्ता आहे. तू या रस्त्याने का आलास असे म्हणून त्यास मारहाण करू लागले तसेच त्यावेळी फिर्यादी हे या ठिकाणी आले असता त्यास व त्याच्या भावास शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून , फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत बिरा अन्नासो दाइंगडे यांनी आरोपींच्या विरुद्ध कवठेमहंकाळ पोलिसात फिर्याद दाखल केली असून कवठेमहंकाळ पोलीस सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.