मच्छे-ओमकारनगरनजीक अपघात : परिसरात हळहळ
वार्ताहर /किणये
वाघवडे रस्त्यावर मच्छे येथे ओमकारनगर नजीक ट्रकच्या चाकाखाली सापडून तरुण जागीच ठार झाला. सदर अपघात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडला असून सोमलिंग बसवराज आलदकट्टी (वय 30) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सध्या तो तरुण लक्ष्मीनगर-मच्छे येथे राहत होता. नोकरीच्या शोधासाठी गेलेल्या तरुणावर काळाने घाला घातल्याने मच्छे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळी एका कंपनीत नोकरीसंदर्भात विचारणा करण्यासाठी सोमलिंग हा गेला होता. सायंकाळी तो दुचाकीवरुन वाघवडे रस्त्यावरुन मच्छेकडे येत असताना पाठीमागून योणाऱया ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. हा अपघात ओमकारनगर नजीक घडला. घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमली होती. घटनास्थळी वडगाव ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. सोमलिंग यांचा मृतदेह बेळगावच्या सरकारी इस्पितळात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत अपघाताच्या एफआयआरची प्रक्रिया सुरू होती.
मच्छे-वाघवडे रस्त्यावर खड्डे
मच्छे-वाघवडे रस्त्यावर वारंवार अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. मच्छेनजीक या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघात होतात. या खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
सोमलिंग यांच्या पत्नीचा आक्रोश
बैलहेंगल तालुक्यातील होळीहोसुर येथील सोमलिंग आलदकट्टी व त्याची पत्नी अश्विनी हे दाम्पत्य मच्छे येथील लक्ष्मीनगरात एका भाडय़ाच्या घरात राहत होते. सोमलिंग हा मच्छे औद्योगिक वसाहत परिसरात मिळतील ती कारखान्याची कामे करीत होता. संसाराचा गाडा चालविताना आपल्या पतीला थोडीबहुत मदत व्हावी या उद्देशाने त्यांची पत्नी अश्विनी ही मच्छे येथील एका पेट्रोल पंपावर काम करते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी हे दांपत्य प्रयत्न करीत होते. अशा परिस्थितीतच पती अपघातात ठार झाल्याची बातमी कानावर येताच सोमलिंगच्या पत्नीने एकच आक्रोश केला. हे पाहून साऱयांचेच डोळे पाणावले.