छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर ऑटोरिक्षाला धडक
बेळगाव : जुन्या पी. बी. रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर भरधाव कारने ऑटोरिक्षाला ठोकरल्याने अहमदाबाद-गुजरात येथील एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून या अपघातात रिक्षाचालकही जखमी झाला आहे. मिहीरकुमार भास्करभाई भावसार (वय 29) रा. अहमदाबाद असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. आपण काम करीत असलेल्या कंपनीच्या कामानिमित्त मिहीरकुमार गुरुवारी रात्री बेळगावला आला होता. ऑटोरिक्षातून जाताना उड्डाणपुलावर भरधाव कारची ऑटोरिक्षाला धडक बसली. त्यानंतर मिहीरकुमार रिक्षातून बाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सिव्हिल हॉस्पिटलला नेताना त्याचा मृत्यू झाला.
रिक्षाचालक शब्बीर सिपाई (वय 28) रा. शहापूर हा जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री 11.50 च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी अहमदाबाद येथील मिहीरकुमारच्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती देण्यात आली. उद्यमबाग येथील एका कंपनीत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत भाग घेण्यासाठी मिहीरकुमार बेळगावला आला होता, अशी माहिती मिळाली आहे.