म्हासुर्ली/वार्ताहर
धुंदवडे पैकी चौधरवाडी (ता.गगनबावडा) येथे मंगळवारी मध्यरात्री झोपत असताना मण्यार जातीच्या सर्पाने दंश केलेल्या ओंकार पांडुरंग भोपळे (वय २२) या तरुणाचा तीन दिवसाच्या उपचारानंतर कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.ओंकारच्या अचानक झालेल्या मृत्यूने धामणी खोऱ्यात सर्वत्र हळहळ होत आहे.
चौधरवाडी येथील ओंकार भोपळे रात्री जेवण करुन झोपला असता मंगळवारी मध्यरात्री त्याला अंथरुणातच मन्यार जातीच्या सर्पाने चावा घेतला होता. सर्पदंश झाल्याचे कळताच ओंकारला मित्रमंडळी व नातेवाईकांनी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले होते.
मात्र मंगळवारी संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी ही ओंकारला जीवदान देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून शर्तीचे प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. अखेर ओंकारला तिसऱ्या दिवशी मृत्यूने गाठलेच. शांत व मन मिळावू ओंकारच्या अचानक जाण्याने धुंदवडेसह धामणी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आजोबा,आजी, चुलते, चुलती व चुलत भाऊ,बहिणी असा परिवार आहे.