लोणावळा / वार्ताहर :
खंडाळा घाटातील मंकी हिल येथील एका खोल दरीत गुरुवारी रात्री पडलेल्या ओडिशातील युवकाला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात लोणावळा, खोपोली व मावळ तालुक्यातील आपत्कालीन पथकांना यश आले. सुदैवाने एका झाडाच्या फांदीला अडकल्याने हा तरुण बचावला.
हरिश्चंद्र मंडल (वय 25, रा. ओडिशा, सध्या रा. गोवा) असे दरीत पाय घसरून पडून जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो गोव्यातील क्रॉम्प्टन कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील हरिश्चंद्र मंडल हा युवक गुरुवारी लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटन व टेकिंगसाठी आला होता. गुरुवारी दुपारी लोणावळय़ातून एक रिक्षा भाडय़ाने करत तो लोणावळा, खंडाळा परिसरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी गेला होता. सायंकाळी तो खंडाळा घाटातील मंकी पॉईंट परिसरात पर्यटन व टेकिंगसाठी गेला होता. यावेळी त्याने रिक्षा चालकाचा मोबाईल नंबर घेतला व मी फोन केल्यावर मला घेण्यासाठी या, असं सांगितल्यामुळे रिक्षा चालक तेथून निघून गेला. त्यानंतर हरिश्चंद्र मंडल हा खंडाळा घाटातील मंकीहिल परिसरात टेकिंगसाठी गेला. अंधार पडल्यानंतर तो पुन्हा परत माघारी फिरत असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान त्याचा मंकीहिल येथील एका दरीजवळ पाय घसरल्याने तो घसरून तेथील खोल दरीत पडला. सुदैवाने तो सदर दरीतील एका झाडाच्या फांदीला अडकला आणि दैव बलवत्तर म्हणून तो वाचला.
दरीत कोसळल्यानंतर त्याने स्वतःला धैर्याने सावरत या घटनेबाबत घरी कळविले. त्यांनतर त्याने या घटनेची माहिती संबंधित रिक्षाचालकाला दिली व मदतीसाठी मागणी केली. रिक्षा चालकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी याबाबत लोणावळय़ातील शिवदुर्ग मित्रच्या पथकाला कळविले. शिवदुर्गच्या पथकाने मावळातील वन्यजीव रक्षक संस्था आणि खोपोलीतील अपघाताग्रस्तांच्या मदतीची संस्था यांना मदतीसाठी निमंत्रित करत कोणताही विलंब न करता संबंधित आपत्कालीन पथकांनी घटनास्थळाचा दिशेने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी दाखल होताच लगेचच मदतकार्य सुरू केले. दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खाली उतरून त्या युवकाला सेफ्टी किट घालून रात्रीच्या गडद अंधारात प्रयत्नांची पराकष्टा करत सुरक्षितरित्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले. त्या ठिकाणी त्याच्यावर प्रथमोपचार करत लोणावळा शहर पोलिसांकडे सुपूर्द केले.