वार्ताहर /हिंडलगा
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर आणखी एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि. 15 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी रस्त्यावर घडली.
सर्वेश अरुण कोलते (वय 22) रा. आंबेवाडी, असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विशाल मारुती मनोळकर (वय 26) रा. आंबेवाडी असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत काकती पोलीस व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वेश कोलते आणि त्याचा मित्र विशाल मनोळकर हे दोघे हिंडलग्यावरून आपल्या घरी आंबेवाडीला जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये सर्वेश कोलते हा युवक जागीच ठार झाला. तर विशाल मनोळकर हा युवक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत पडला होता. जखमी विशालवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा झाल्यानंतर सर्वेशचा मृतदेह सोमवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात आंबेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ऐन सणादिवशीच घडलेल्या या अप्रिय घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिवाय नुकताच डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता हा अत्यंत कमी रुंदीचा असून अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काकती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
रस्त्याची रुंदी वाढविण्याची गरज
काही दिवसांपूर्वीच आंबेवाडी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पण, सदर रस्ता अत्यंत कमी रुंदीचा झाला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनांना जागा कमी पडत असून, लोकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तरी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन रस्त्याची रुंदी वाढविण्याची गरज आहे.
– अनंत तुडयेकर, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष, आंबेवाडी.