प्रतिनिधी / फोंडा
वडाळवाडा-मडकई येथे प्रवासी बस व टाटा टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात टेम्पोच्या पाठीमागे बसलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला. प्रदिप उर्फ बोभी सिताराम गावडे (31, वडाळवाडा-मडकई) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात मंगळवार 22 रोजी रात्री 9 वा. सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशी बस जीए 01 डब्ल्यू 4080 मडकई येथील नवदुर्गा देवस्थानकडून मडकई फेरीबोट-टोक येथे जात होती. वडाळवाडा येथील ग्लोबल इंन्डस्ट्रीजवळील अरूंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या प्रवासी बसला वाट मोकळी करून देण्यासाठी थांबलेला मालवाहू जीए 01 डब्ल्यू 1178 टेम्पोवर प्रवासी बसची निसटती धडक बसली. या धडकेत पाठिमागे बसलेला युवक टेम्पोमधील साहित्याच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाला. मडकई येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बुधवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत प्रदिप हा बोभी या नावाने मडकई भागात परिचित होता. तो अविवाहित असून अंत्यत मनमिळावू स्वभावाचा होता. रोजंदारीवर काम करून तो आपला उदारनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहे.