प्रतिनिधी /बेळगाव
गुटखा खाऊन थुंकल्यानंतर अंगावर थुंकी उडाल्याने झालेल्या वादावादीतून दगडाने ठेचून एका युवकाचा खून करण्यात आला आहे. बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथे रविवारी रात्री ही घटना घडली असून त्याच गावातील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मंजुनाथ रुद्राप्पा सुणगार (वय 45) रा. अनिगोळ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच गावातील अजय ऊर्फ गुरुबसय्या राचय्या हिरेमठ (वय 25) याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक, बैलहोंगलचे पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. सालीमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सोमवारी बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात उत्तरीय तपासणी करून मंजुनाथचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुनाथ व अजय हे दोघे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अनिगोळ येथील एका पान दुकानासमोर उभे होते. त्यावेळी गुटखा खाऊन थुंकल्यानंतर मंजुनाथची थुंकी अजयच्या अंगावर उडाली. त्यामुळे दोघा जणांमध्ये वादावादी झाली. वादावादीनंतर रस्त्याशेजारी पडलेला दगड उचलून अजयने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. बैलहोंगल पोलीस पुढील तपास करीत आहेत.