खांडेपार पूल-उसगांव जंक्शननजीक अपघात
प्रतिनिधी/ फोंडा
खांडेपार येथील जुन्या पुलाजवळील उसगांव जंक्शनवर दुचाकीची अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या म्हशीला धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला. रामलाल प्रकाश साळुंके (20, रा. मेटावाडा-धारबांदोडा) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात शुक्रवारी उशिरा रात्री 2 वा. घडला. म्हशीच्या धडकेत युवकाला जीव गमवावा लागल्याने रस्त्यावरील भटक्या गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल आपल्या ऍक्टिवा दुचाकीने (क्र. जीए-12-बीö4452) फोंडय़ाहून धारबांदोडय़ाच्या दिशेने जात होता. त्याच्या मित्रांनी उसगांव कालोत्सवाला जाण्याचा बेत आखला होता. त्यामुळे खांडेपार येथील जुन्या पुलाजवळील उसगांव जंक्शनजवळ गाडी वळवताना अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशीला त्याच्या दुचाकीची धडक बसली. म्हशीला धडक दिल्यानंतर गाडीवरचा ताबा सुटून दुसऱया एका दुचाकी पल्सरला धडक बसून रस्त्यावर कोसळून तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
मयत रामलाल साळुंके कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील असून सध्या वास्तव्य गोव्यात आहे. बेतोडा रोड-कुर्टी येथील बीडीएफ कंपनीत तो कामाला होता. शुक्रवारी रात्री कामावरून सुटल्यानंतर घरी परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे पितृछत्र हरपलेले असून आई व बहिणींचा तो एकमेव आधार होता. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे.