क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलावात आयोजित राष्ट्रीय निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना दोन सुवर्ण पाच रौप्य व चार कांस्य अशी एकूण 11 पदके मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत आदी शिरसाठ केंद्रीय विद्यालय-3 च्या विद्यार्थ्याने ग्रुप क्रमांक एकमध्ये 400, 800 व 1500 मी. फ्रीस्टाइल स्पर्धेत 1 रौप्य व 2 कांस्यपदके पटकाविले. दिशा होंडी एमआर भंडारी शाळेच्या विद्यार्थिनीने ग्रुप क्रमांक तीनमध्ये 50, 100, 400 मी. फ्रीस्टाइल व 50 मी. बटरफ्लाय, 50 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत 2 रौप्य व 1 कांस्यपदक पटकाविले. आरोही चित्रगार जैन हेरिटेज स्कूल हिने ग्रुप चारमध्ये 50, 100 मी. फ्रिस्टाईल, 50 मी. बॅकस्ट्रोक, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 50 मी. बटरफ्लायस्ट्रोकमध्ये 2 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्यपदक संपादन केली. वरील सर्व जलतरणपटूंना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार व इतर सहशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.