प्रा. अजितकुमार कोष्टींकडून बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत हास्यकल्लोळ
प्रतिनिधी /बेळगाव
‘आमचं गण्या जेव्हा कुवेतला गेलं’, आमचं गण्या जेव्हा कन्नड शिकलं तेव्हा ते अफलातून कानडीमिश्रित मराठी कसं बोललं याची हुबेहुब नक्कल करत अनेक गंमती-जमती प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी विनोदी ढंगांनी मांडल्या. मास्क घालण्याच्या पद्धतींनी उपस्थितांना खळखळून हसायला लावलं. सर्वसामान्य जीवनातही अनेक विनोद घडत असतात. त्या विनोदांची मजा घेत आनंदी जीवन जगा, असे सांगत कोष्टी सरांच्या गण्याने सर्वांना पोट धरून हसवलं.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सोमवारी पार पडले. सांगली येथील हास्यकलाकार प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी दैनंदिन जीवनातील विनोद सांगून खळखळून हसायला लावले. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह लता पाटील, संचालिका सुनीता मोहिते उपस्थित होते.
कोरोना काळात घडलेल्या गंमती-जमती, विनाअनुदानीत शिक्षकांच्या समस्यांचे विनोदी ढंग, महिलांची क्रिकेट मॅच, सोशल मीडियावरील फजिती, जनगणना यासह विविध विनोद सांगून त्यांनी हास्यांचे फटाके फोडले. उपस्थित बेळगावकर रसिकांनी टाळय़ांची दाद दिली. अध्यक्ष नेताजी जाधव यांनी कोष्टी यांचे स्वागत केले. सुनीता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
प्राचार्य यशवंत पाटणे शेवटचे पुष्प गुंफणार
नाथ पै व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प साताऱयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे गुंफणार आहेत. वाचनालयाच्या सभागृहात ‘जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर दि. 19 रोजी सायं. 5.30 वा. त्यांचे व्याख्यान होणार आहे. शेकोटी, स्वरगंगेच्या काठी, स्वयंशिल्पी, सुंदर जगण्यासाठी, ग्रंथ आमुचे साथी आदी ग्रंथ त्यांचे प्रकाशित झाले आहेत. ‘सहावे सुख’ ग्रंथातील लेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविले आहे.