ज्युनियर एनटीआर असणार मुख्य भूमिकेत
अभिनेता आमिर खानने आपण चित्रपटांपासून ब्रेक घेत असल्याची घोषणा काही महिन्यापूंर्वी केली होती. त्याचा अखेरचा चित्रपट ‘लालसिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. परंतु या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याचमुळे आमिरने स्वतःचा निर्णय बदलावा अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात होती. आमिर आता ज्युनियर एनटीआरसोबत एका चित्रपटात दिसून येणार असल्याची चर्चा आहे.
‘केजीएफ’ प्रँचाइजीचे दिग्दर्शक प्रशांत नील हे आमिर खान अन् ज्युनियर एनटीआर यांना सोबत घेत एक चित्रपट निर्माण करत असल्याचे समजते. ज्युनियर एनटीआर आणि प्रशांत नील हे ‘एनटीआर 31’ नावाच्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. या चित्रपटाची घोषणा प्रशांतने मे महिन्यातच केली होती. तसेच चित्रपटाचे पोस्टरही शेअर करण्यात आले होते.
हा चित्रपट पूर्ण देशात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटासंबंधी आमिर खानकडून कुठलेच वक्तव्य करण्यात आलेले नाही. परंतु प्रशांत नीलच्या या चित्रपटात आमिर खान हा खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.
आमिरने यापूर्वी दीड वर्षासाठी चित्रपटांमधून बेक घेण्याची घोषणा केली होती. एखादा चित्रपट स्वीकारल्यावर माझे पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रीत होते. याचमुळे दीड वर्षापर्यंत अभिनय करणार नाही, केवळ कुटुंबासमवेत वेळ घालविणार असल्याचे आमिरने म्हटले होते. ‘लालसिंह चड्ढा’द्वारे आमिरने चार वर्षांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले होते. आमिर याचबरोबर ‘चॅम्पियन्स’ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे.