एसीबीच्या छाप्यात सापडले पिस्तुल ः 24 लाखाची रोकडही जप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी शाखेने (एसीबी) शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानासह 5 ठिकाणी छापे टाकले होते. दोन ठिकाणांहून 24 लाख रुपये रोख आणि दोन पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहेत. यातील एक पिस्तुल विदेशी असून ते परवानाप्राप्त नाही.
वक्फ मंडळाशी निगडित घोटाळय़ाप्रकरणी एसीबीने आमदाराच्या निवासस्थानासह जामिया, ओखला आणि गफूरनगरमध्ये 5 ठिकाणी छापे टाकले होते. वक्फ मंडळाच्या बँक खात्यात गैरव्यवहार, मंडळाच्या मालमत्तांचा गैरवापर, वाहन खरेदीतील भ्रष्टाचार, स्वतःच्या निकटवर्तीयांच्या नियुक्तीसह 33 आरोप आहेत. 2020 मध्ये एसीबीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.