कॉलर पकडून लगावले ठोसे ः करावे लागले पलायन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील सत्तारुढ आम आदमी पक्षाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री उशिरा मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांच्या मारहाणीतून वाचण्यासाठी आमदार पळत असल्याचे काही लोक त्यांचा पाठलाग करत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते.
कार्यकर्त्यांनी आमदाराला धक्काबुक्की केली आहे. तसेच कॉलर पकडून ठोसे लगावले आहेत. या घटनेवर आम आदमी पक्षाकडून कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या मुद्दय़ावर कुठलीच टिप्पणी केलेली नाही.
आमदार गुलाब सिंह यादव सोमवारी रात्री स्वतःच्या कार्यकर्त्यांसोबत बैठकीत सामील झाले असताना मारहाणीची घटना झाली आहे. या बैठकीत आपच्या नाराज कार्यकर्त्यांनी आमदाराला बडवले आहे. यादव तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा पकडून मारहाण केली आहे. आमदाराला कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यास अखेर यश मिळाले. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी तिकीट विक्रीचा प्रकार आमदाराने केल्याने कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
तर आमदार यादव यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा होणारा आरोप चुकीचा आहे. भाजप कार्यकर्त्यांमुळे ही मारहाण झाल्याचा दावा यादव यांनी केला आहे.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रामाणिक राजकारणाचे नाटक करणाऱया पक्षातील अनोखे दृश्य. आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचारामुळे त्याचे सदस्य स्वतःच्या आमदारांना मारहाण करत आहेत अशी उपरोधिक टीका पात्रा यांनी केली आहे.