नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील हेरगिरी प्रकरणावरून गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाविरोधात निदर्शने केली. भाजपने आयटीओ ते सचिवालय असा निषेध मोर्चा काढला. तसेच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली. पक्षाचे कार्यकर्ते केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दिल्लीतील केजरीवाल सरकारवर भाजप नेत्यांची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. दिल्लीचे फीडबॅक युनिट हेरगिरी करण्यात गुंतले आहे. आपचे नेते दिल्लीसाठी काम करत नसून दिल्लीच्या करदात्यांच्या पैशातून बेकायदेशीरपणे हेरगिरी करत आहेत, असा आरोप भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे.
2015 मध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने नेते आणि अधिकाऱयांची हेरगिरी केली होती. यासाठी फीडबॅक युनिट तयार करण्यात आले. या प्रकरणी सीबीआयने लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांच्याकडे अधिक तपास करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांनी हे प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठवले आहे.