गुजरातमध्ये इशुदान गढवी यांच्यावर भिस्त ः केजरीवालांकडून घोषणा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने स्वतःचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. ‘आप’च्या वतीने इशुदान गढवी हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
गुजरातच्या जनतेने स्वतःचा मुख्यमंत्री निवडला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सुचना मागविल्या होत्या. आमच्याकडे 16 लाख 48 हजार लोकांचे उत्तर प्राप्त झाले होते. यातील 73 टक्के लोकांनी गढवी यांच्या नावाला पसंती दिल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
इशुदान गढवी हे पेशाने पत्रकार देखील आहेत. 14 जून 2021 रोजी गढवी यांनी आम आदमी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते. गुजरातमध्ये ‘आप’चा तळागाळाशी जोडला गेलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून गढवी यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. गोपाल इटालिया गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. तसेच इटालिया हे पाटीदार समुदायाची पार्श्वभूमी असणारे नेते आहेत. 2017 मधील पाटीदार आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहऱयांपैकी ते एक होते. स्वतःच्या वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत असतात. याचबरोबर अल्पेश कथेरिया यांचेही नाव चर्चेत होते. त्यांनी मागील महिन्यातच आपमध्ये प्रवेश केला होता.
गढवी यांच्यासोबत रोड शो
निवडणूक जाहीर झाल्यावर ‘आप’ने गुजरातमधील प्रचारमोहिमेला वेग दिला आहे. पक्ष आजपासून रोड शोंना सुरूवात करणार आहे. या रोड शोमध्ये अरविंद केजरीवालांसह इशुदान गढवी हे सहभागी होणार आहेत. आपकडून राज्यात दररा 2-3 रोड शो आयोजित केले जाणार आहेत.