आहारासाठी लागणारे साहित्य देण्याची तयारी, काणकोणच्या भागशिक्षणाधिकाऱयांची भेट
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील शाळांना माध्यान्ह आहार पुरविणाऱया ओंकार स्वयंसाहाय्य गटाने शिक्षण खात्याकडून जी रक्कम दिली जाते ती परवडत नसल्याचे कारण ठेवून मागच्या 12 दिवसांपासून माध्यान्ह आहाराचा पुरवठा बंद केलेला आहे. ही जबाबदारी काणकोणच्या आम आदमी पक्षाने स्वीकारण्याची तयारी दाखविली असून जोपर्यंत सरकार या स्वयंसाहाय्य गटाची रक्कम वाढवून देत नाही तोपर्यंत माध्यान्ह आहारासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती पक्षाचे काणकोणातील प्रमुख कार्यकर्ते संदेश तेलेकर आणि वैभव फळदेसाई यांनी दिली.
या तालुक्यातील जवळजवळ 1900 इतकी मुले मागच्या 12 दिवसांपासून माध्यान्ह आहारास वंचित झालेली असून शिक्षण खात्याने जो मेनू ठरवून दिलेला आहे त्यानुसार त्यासाठी लागणारी कडधान्ये आणि अन्य साहित्य घेऊन तेलेकर यांनी काणकोणचे भागशिक्षणाधिकारी अशोक गावस देसाई आणि लॉरेन्स पेरेरा यांची भेट घेतली. आम आदमी पक्ष सदर माध्यान्ह आहारासाठी लागणारे सर्व साहित्य द्यायला तयार आहे. मात्र आहार तयार करण्याची जबाबदारी संबंधित स्वयंसाहाय्य गटाने घ्यावी आणि त्यासाठी शिक्षणखाते जी रक्कम देते त्या रकमेचा वापर करावा, असे तेलेकर आणि फळदेसाई यांनी सूचित केले.
यासंबंधी भागशिक्षणाधिकारी अशोक गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपण आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यासंबंधीचे लेखी निवेदन देण्यास सूचित केले आहे. त्यानंतर शिक्षण खाते जो निर्णय घेईल त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून काणकोण तालुक्यातील गावडोंगरी, खोतीगाव तसेच अन्य भागांतील मिळून 1900 इतक्या मुलांना माध्यान्ह आहार मिळालेला नाही. मात्र शिक्षण खात्याने यासंबंधी साधी विचारपूस व चौकशी देखील केली नसल्याने पालक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.