पंतप्रधान मोदींवर केली होती आक्षेपार्ह टिप्पणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमधील आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक तथा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना दिल्लीत ताब्यात घेण्यात आले होते. इटालियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने गोपाल इटालिया यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. तेथून दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना सरिता विहार पोलीस ठाण्यात नेले होते. दोन्ही ठिकाणी जवळपास तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत गुजरात आम आदमी पार्टीचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीदरम्यान दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तसेच इटालिया यांना विनाकारण चौकशीच्या फेऱयात अडकवून अटक झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केल्याने खळबळ निर्माण झाली होती. वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. गोपाल इटालिया यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता. या संदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अटक केल्याचा ‘आप’चा दावा
दिल्ली पोलिसांनी आप गुजरातचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांना अटक केली आहे, असा दावा आम आदमी पक्षाने केल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सोशल मीडियावर यासंबंधीचे वृत्त पसरल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले होते. तथापि, दिल्ली पोलिसांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. गोपाल इटालिया यांना केवळ ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. खरे तर पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने गोपाल इटालिया यांना आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत बोलावले होते. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
गोपाल इटालिया हे आक्षेपार्ह कमेंट आणि विधानांमुळे सतत वादात असतात. नुकताच एक व्हिडीओही समोर आल्यानंतर इटालिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे.