भाजपच्या रेखा गुप्ता 34 मतांनी पराभूत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महापालिका निवडणुकीची प्रकिया पार पडल्यापासून 80 दिवसांनंतर दिल्लीला नवा महापौर मिळाला आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांची बुधवारी महापौरपदी निवड झाली. शैली ओबेरॉय नांना 150 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या उमेदरवार रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला.
दिल्ली महापौरपदासाठी बुधवारी अखेर निवडणूक पार पडली. डिसेंबर 2022 मध्ये दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत आम आमदी पक्षाला 134 तर भाजपाला 104 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर महापौर पदासाठी दोनवेळा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, दोन्हीवेळी गोंधळ निर्माण झाल्याने आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदान घेण्यात आले. यावेळी दिल्लीतील 10 खासदार, 14 आमदार आणि निवडून आलेल्या 250 पैकी 241 नगरसेवकांनी मतदान केले. काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी निवडणुकीत भाग घेतला नाही. 250 जागांच्या सभागृहात महापौर होण्यासाठी 138 मतांची गरज होती.
जनतेचा विजय, गुंडांचा पराभव ः आप
महापौरपदी निवड झालेल्या शैली ओबेरॉय या पटेलनगर भागातील वॉर्ड क्रमांक 86 च्या नगरसेविका आहेत. या विजयानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे आभार मानले. तसेच आम्ही उद्यापासूनच काम सुरू करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच ‘हा जनतेचा विजय आणि गुंडांचा पराभव आहे. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन. तसेच पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेचे आभार’, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
दिल्लीत 10 वर्षांनंतर महिला महापौर
दिल्लीला 10 वर्षांनंतर महिला महापौर मिळाल्या आहेत. 2011 मध्ये भाजपच्या रजनी अब्बी या शेवटच्या महिला महापौर होत्या. यानंतर 2012 मध्ये शीला दीक्षित सरकारमध्ये दिल्ली महानगरपालिकेची 3 भागात विभागणी करण्यात आली. 2022 मध्ये हे भाग पुन्हा एकत्र आले. त्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. दिल्लीत एमसीडीच्या निवडणुका 4 डिसेंबर 2022 ला पार पडल्या, तर त्यांचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर करण्यात आले होते.
आप नगरसेवकांची पोलिसांशी झटापट
सकाळी 11 वाजता मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी नागरी केंद्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ‘आप’च्या नगरसेवकांची पोलिसांशी झटापटही झाली. भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांना सभागृहात प्रवेश करण्यास आप नगरसेवकांचा विरोध होता. गदारोळ होण्याची भीती पाहता सभागृहात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सभागृहात एसएसबीचे जवान तैनात करण्यात आले होते.