अझरबैजानमध्ये पूर्ण केले चित्रिकरण


लव यात्री या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारा आयुष सध्या स्वतःच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच व्यस्त आहे. अलिकडेच त्याने या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे एक सत्र पूर्ण केले आहे. यासंबंधी माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली आहे. चित्रपटाची नायिका सुश्री मिश्रासोबतचे एक छायाचित्र त्याने शेअर केले आहे. कडाक्याच्या थंडीत आम्ही चित्रिकरण केले आहे. एएस04 या चित्रपटाच्या टीमचे खरोखरच कौतुक. अझरबैजानमध्ये आमचे चित्रिकरण संपले आहे असे आयुषने याच्या कॅप्शनदाखल नमूद केले. आयुषच्या या चित्रपटाचे अद्याप अधिकृत नाव समोर आलेले नाही. या चित्रपटाद्वारे सुश्री मिश्रा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कात्यायन शिवपुरी करत आहेत. आयुषसोबत या चित्रपटात जगपति बाबू यासारखा दाक्षिणात्य स्टार देखील काम करत आहे. या चित्रपटाची निर्मिती के.के. राधामोहन सत्य साई आर्ट्सच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. आयुष यापूवीं ‘अंतिम’ या चित्रपटात दिसून आला होता. यात त्याच्यासोबत सलमान खानने यात काम केले होते. चित्रपटातील आयुषच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते. परंतु महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता.