नाव सुचविल्याबद्दल ममता बॅनर्जींचे मानले आभार
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी नावाचा प्रस्ताव दिल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदींचे आभार व्यक्त केले. विरोधी पक्षाने अब्दुल्ला यांचे नाव सुचविले होते.
15 जून रोजी दिल्लीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर शरद पवार यांनीही राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दर्शवला होता. आता अजूनही गोपालकृष्ण गांधी यांचे नाव चर्चेत आहे. येत्या आठवडय़ात दिल्लीत पुन्हा विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यात विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्यावर चर्चा होणार आहे.