प्रतिनिधी /बेळगाव
प्रसिद्ध उद्योजक विजयराव पुसाळकर यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 5 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘अभंगरंग’ हा कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे विशेष सहकार्य लाभले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त संत रचनांवर आधारित या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर व मंजुषा पाटील यांचे गायन होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन गोविंद भगत करणार असून त्यांना तबल्याची साथ प्रशांत पांडव, अभिषेक शिनकर संवादिनीची, प्रथमेश तारळकर पखवाजची तर आदित्य आपटे साई रिदमवर साद करतील.
गायिकांचा परिचय पुढील प्रमाणे….
आरती अंकलीकर
आरती अंकलीकर या आग्रा, ग्वाल्हेर व जयपूर घराण्याच्या गायिका आहेत. पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तेजोमय, नादब्रम्ह, राग-रंग हे अल्बम प्रसिद्ध असून अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. दोन चित्रपटांच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशात आणि परदेशात त्यांच्या गायनाच्या मैफली झाल्या आहेत. ‘दे धक्का’ चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार मिळाला आहे.
मंजुषा पाटील
मंजुषा पाटील यांचा जन्म सांगलीचा. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी घेतली असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून संगीत विषयात एमए केले आहे. यामध्ये त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण पं. चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे झाले.
एका संगीत स्पर्धेवेळी संगीताचार्य पं. डी. व्ही. काणेबुवा यांनी मंजुषा यांच्या गायकीची क्षमता ओळखली आणि त्यांना गुरुकुल पद्धतीने आग्रा व ग्वाल्हेर घराण्याचे संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढे डॉ. विक्रम कशाळकर यांच्याकडे त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. सध्या पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. काणेबुवा प्रति÷ानच्या आश्रयाखाली त्यांनी सांगली येथे गुरुकुल स्थापन केले आहे.
त्यांना संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मल्ला खान पुरस्कार, पं. कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कार, पं. बसवराज राजगुरू युवा पुरस्कार आणि गानसरस्वती पुरस्कार प्राप्त झाले आहेत.