सांगली- शिवसेनेच्या सांगली जिल्हा प्रमुखपदी चिकुर्डे (ता. वाळवा) येथील अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सांगलीचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने नवे जिल्हा प्रमुख म्हणून अभिजीत पाटील यांची निवड झाली. मंगळवारी मातोश्री वरून ही निवड जाहीर करण्यात आली. अभिजीत पाटील यांनी सन २०१५ साली काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांनी चिकुर्डे मतदार संघातून दोन वेळा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. सन २०१४ साली आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक ही लढवली होती.
आनंदराव पवार यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटील यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. शिवसेना प्रमुखांनी मंगळवारी दिनांक २६ रोजी त्यांची निवड जाहीर केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काम करू, असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.