नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंमत असेल तर आपल्याला कारागृहात डांबूनच दाखवा, असे आव्हान पश्चिम बंगालमधील तृणमूल काँगेसचे नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला दिले आहे. त्यांनी शनिवारी पश्चिम बंगाल विधानसभेतील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला असणाऱया कंठी या पूर्व मिदनापूर जिल्हय़ातील स्थानी जाहीर सभा घेतली.
काही दिवसांपूर्वी सुवेंदू अधिकारी यांनी बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भष्टाचाराला ऊत आल्याची टीका केली होती. सर्व चोरांना कारागृहात पाठविले पाहिजे, असेही विधान त्यांनी केले होते. भाजप राज्यात सत्तेवर आल्यास भ्रष्टाचाराला मूठमाती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
सध्या राज्यात भाजप आणि तृणमूल यांच्यात शाब्दीक वाद रंगला आहे. आणखी काही महिन्यांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी दोन्ही पक्ष करीत आहेत. त्यामुळे एकमेकांच्या बालेकिल्ल्यात सभा घेण्याचा सपाटा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लावला आहे. पश्चिम बंगालमधील वाढती गुन्हेगारी आणि अल्पसंख्याकांचे लांगूलचालन यावरुन भाजपने तृणमूलला लक्ष्य केले आहे. तर तृणमूल भाजपवर राज्यात जातीय तणाव वाढविण्याचा आरोप करीत आहे. राजकीय वातावरण त्यामुळे तापले आहे.