क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
विशाखापट्टणम येथे आंध्र विद्यापीठ आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोलर्स स्पोर्ट्स स्केटींग स्पर्धेत इनलाईन स्पीड स्लॅलममध्ये बेळगावच्या अभिषेक नवलेने सुवर्णपदक पटकाविले. गेल्या अनेक वर्षापासून अभिषेक नवलेने स्केटींग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत विक्रमही नोंदविले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत सूर्यकांत हिंडलगेकर यांनी दिली. लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटींग रिंकवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेली 16 वर्षे अभिषेक महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय नंदगड येथे शिकत असून, त्याने स्केटींगमध्ये 2 वेळा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. अभिषेकचे वडिल परिवहन मंडळाचे कर्मचारी आहेत. त्याला संघटनेचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, क्रीडा निर्देशक जगदीश गस्ती, मुख्याध्यापक जगदीश जोडांगी, एस. व्ही. पाटील, क्रीडा शिक्षक के. व्ही. पाटील, सी. एस. बिडनाळ यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगने, सक्षम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.