कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे प्रतिपादन : फोंड्यात 43 व्या सम्राट संगीत संमेलनाचे उद्घाटन
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोव्याच्या संगीत क्षेत्रामध्ये पारतंत्र काळापासून अनेक नामवंत गोमंतकीय कलाकारांनी कसदार कलागुणांच्या बळावर लौकीक प्राप्त करून सातासमुद्रापार आपली नाममुद्रा उमटविली. आज सर्व सोयीसुविधांसह राजाश्रय आणि लोकाश्रय मिळूनसुद्धा त्या तोडीचे कलाकार संगीत क्षेत्रात घडत नाहीत हे न सुटणारे कोडे बनले आहे. यावर तोडगा म्हणून गोव्यात गुरूशिष्य परंपरेच्या माध्यमातून कंठसंगीताची आणि वाद्यसंगीताची दिक्षा देणारी अकादमी सुरू करण्याचा विचार असून एका वर्षाच्य आत अशा पद्धतीचा प्रकल्प पुर्णत्वास आणला जाईल अशी माहिती कला आणि संस्कृती गोविंद गावडे यांनी 43 व्या सम्राट संगीत संमेलनात बोलताना आपल्या भाषणातून दिली.
राजीव गांधी कला मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सम्राट संगीत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी खास अतिथी म्हणून गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, सम्राट संगीत अकादमीचे डॉ. प्रफुल्ल हेदे, संमेलनाध्यक्ष अॅड अवधुत सलत्री, सम्राटचे राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, संदीप निगळ्यो, सागर पानवेलकर, सुधाकर नागेशकर व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले की साधना आणि तपश्चर्या संगीत विद्यार्जन करणाऱ्या पिढीने जोपासली पाहिजे. जोपर्यंत परिपक्वता प्राप्त होत नाही तोपर्यत मैफल करणार नाही हा संयम विद्यार्थ्यांमध्ये हवा तरच महान कलाकार बनण्याचे स्वप्न सहज साकार होईल.
याप्रसंगी बोलताना प्रा. अनिल सामंत म्हणाले की नामांकित कलाकारांना गोव्यात आणून शास्त्रीय संगीताला गोवा राज्यात दिशा प्राप्त करून देण्याचे काम सम्राट क्लबने केले आहे. मात्र संगीत क्षेत्राकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन बदलायचा असेल तर गुरूशिष्य परंपरा हा उत्तम पर्यांय ठरू शकतो. त्यासाठी शासकीय पातळीवरून हा प्रयोग सुरू व्हायला हवा. प्रफुल्ल हेदे यांनी प्रास्ताविक केले. अॅड अवधूत सलत्री यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. तद्नंतर सांगितीक मैफिली झाल्या. ज्यामध्ये गोमंतकीय सतारवादक सदानंद आमोणकर यांचे सतारवादन व पं. हरिष तिवारी (दिल्ली) यांचे गायन झाले.