बेळगाव, बागलकोट, धारवाड, बेंगळूरसह विविध जिल्हय़ांमध्ये कारवाई : बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी 21 अधिकाऱयांना दणका
प्रतिनिधी /बेंगळूर
भ्रष्ट अधिकाऱयांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाची (एसीबी) कारवाई सुरूच असून शुक्रवारी राज्यभरात 21 सरकारी अधिकाऱयांना दणका देण्यात आला. बेळगाव, बागलकोट, धारवाड, बेंगळूरसह विविध जिल्हय़ांमध्ये एकूण 80 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून अधिकाऱयांची निवासस्थाने, कार्यालयांमध्ये झडती घेण्यात आली आहे. अनेकांजवळ मोठे घबाड आढळून आले असून एसीबीच्या अधिकाऱयांनी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळी 300 हून अधिक एसीबीच्या अधिकाऱयांनी धाडसत्र हाती घेतल्याने भ्रष्ट अधिकाऱयांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
बागलकोटचे आरटीओ अधिकारी यल्लप्पा पडसाली यांच्या धारवाडमधील लकमनहळ्ळी केएचबी कॉलनी येथील निवासस्थानी 17 लाख रुपये, 3 सोन्याची नाणी, 2 चांदीची नाणी, 250 ग्रॅम सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीच्या वस्तू आढळून आल्या आहेत.
त्यांच्या बागलकोटमधील निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बागलकोटच्या निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक शंकर गोगी यांच्या निवासस्थानी 1.15 लाख रु. सोन्याचे दागिने, चांदीचा चंबू, रोख रक्कम तसेच मुलाच्या नावे बँकेत 8 लाख 90 हजार रुपये ठेवी यासह स्थावर मालत्तेशी संबंधीत कागदपत्रे आढळून आली आहेत. शिवाय त्यांच्या नावे टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा एक्सयुव्ही 500 या दोन ऐशोआरामी कार आहेत. गोगी यांच्या मालमत्तांवर डीएसपी सुरेश रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने छापा टाकला.
बेंगळूरमध्ये निवृत्त अधीक्षक अभियंता मंजुनाथ यांच्या जयनगर येथील 20 कोटी रुपये किमतीच्या व्यापारी संकुलावरही एसीबीने छापा टाकला आहे. निवृत्तीनंतरही नोंदणी आणि मुद्रांक खात्याच्या कर्मचाऱयांना धमकावून बेकायदेशीरपणे उत्पन्न मिळवित असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यातूनच त्यांनी 20 कोटींपेक्षा अधिक माया जमविल्याचा आरोप आहे. विविध खात्यांमध्ये एजंटाप्रमाणे ते काम करीत असल्यामुळे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी झाली होती. छाप्यावेळी त्यांच्या निवासस्थानी विविध खात्यांशी संबंधीत फाईली आढळल्या आहेत.
हावेरीमध्ये तुंगा योजनेच्या साहाय्यक योजना अधिकारी एई चंद्रप्पा ओलेकार, कोप्पळ जिल्हय़ाच्या गंगावती ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उदय रवी, चिक्कमंगळूर जिल्हय़ातील द्वितीय श्रेणी साहाय्यक अधिकारी तिम्मय्या यांच्या तीन मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. कारवारचे सार्वजनिक बांधकाम अभियंता राजीव नायक, कारवार जिल्हा निबंधक श्रीधर यांच्या निवासस्थानांचीही झडती घेण्यात आली आहे.
गुलबर्गा येथे महिला आणि बालकल्याण खात्याचे योजना अधिकारी तिप्पण्णा सरसगी यांच्या कार्यालयासह निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. बिदरमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अनेक महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप तिप्पण्णा यांच्यावर आहे.
कारवाई करण्यात आलेले अधिकारी
- बी. वाय. पवार-अधीक्षक अभियंता, बेळगाव
- मधुसूदन-जिल्हा रजिस्ट्रार, आयजीआर कार्यालय, बेळगाव
- मृत्युंजय तिराणी-साहाय्यक नियंत्रक, कर्नाटक पशूसंगोपन, प्राणी आणि मत्स्योद्योग विद्यापीठ, बिदर
- परमेश्वरप्पा-साहाय्यक अभियंता, लघुपाटबंधारे खाते-कोडीलगी, विजयनगर
- तिप्पण्णा सिरसगी- महिला-बालकल्याण अधिकारी, बिदर
- उदय रवी- सीपीआर, कोप्पळ
- हरिष- साहाय्यक अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, उडुपी
- रामकृष्ण एच. व्ही.- साहाय्यक अभियंता, हासन
- राजीव नायक- साहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कारवार
- बी. आर. बोपय्या, जि. पं. कनिष्ठ अभियंता, पोन्नंपेठ
- यल्लप्पा पडसाली- आरटीओ अधिकारी, बागलकोट
- शंकरप्पा गोगी- प्रकल्प संचालक, निर्मिती केंद्र-बागलकोट
- प्रदीप आलूर- द्वितीय श्रेणी सचिव, आरडीपीआर-गदग
- सिद्धप्पा टी.- उपमुख्य विद्युत अधिकारी, बेंगळूर
- मोहन कुमार- कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग-चिक्कबळ्ळापूर
- मंजुनाथ जी.- निवृत्त साहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-बेंगळूर
- बी. जी. तिम्मय्या- क्लार्क, कडूर नगरपालिका
- चंद्रप्पा होलेकार- युटीपी ऑफिस, राणेबेन्नूर
- जनार्दन- निवृत्त निबंधक, बेंगळूर
- श्रीधर- नोंदणी अधिकारी, कारवार
- शिवलिंगय्या – बीडीए क श्रेणी कर्मचारी, बेंगळूर
निवृत्तीच्या उंबरठय़ावरील अभियंत्याच्या घरावर छापा
एक किलो सोने, आठ लाख रुपये मालमत्तांची कागदपत्रे जप्त
राज्यातील 21 सरकारी अधिकाऱयांच्या घरांवर एसीबीने शुक्रवारी छापे टाकले आहेत. बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंते बी. वाय. पवार यांच्या घरासह सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ 15 दिवसांत ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्याआधीच त्यांच्यावर एसीबीने छापा टाकला.
या कारवाईने अधिकाऱयांत खळबळ माजली आहे. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, प्रकाश रेड्डी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, निरंजन पाटील, नियाज बेग, मंजुनाथ यांच्यासह 25 हून अधिक एसीबी अधिकाऱयांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला. शुक्रवारी इंद्रप्रस्थनगर येथील बी. वाय. पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला.
एकाचवेळी बेळगाव, निपाणी परिसरातील सहा ठिकाणी तपासणी झाली आहे. इंद्रप्रस्थनगर येथील घर, विश्वेश्वरय्यानगर येथील सरकारी क्वॉर्टर्स, किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय, निपाणी येथील घर, कुटुंबीयांच्या घरांवर तपासणी करण्यात आली.
बोरगाव येथील टेक्स्टाईल्स मिलवरही छापा टाकून तपासणी करण्यात आली आहे. एसीबीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत 1 किलो सोने, 8 लाख रुपये रोख रक्कम व किमती मालमत्ता संबंधीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
उपलब्ध माहितीनुसार बी. वाय. पवार हे 30 जून रोजी सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवेतून निवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्तीला केवळ 15 दिवस शिल्लक असताना त्यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.