महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, रखडलेले चौपदरीकरण निकृष्ट दर्जाचे, कामामुळे अपघातांना निमंत्रण
खेड : मुंबई गोवा महामार्गावर आज पुन्हा एकदा महामार्गावरील वेरळ येथे कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे उपचारांदरम्यान निधन झाले. संदेश सुरेश बुटाला असे या दुचाकीस्वाराने नाव असून तो खेड येथील आहे.
खेड शहरात राहणारे संदेश बुटाला हे आपल्या दुचाकीने मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे गेले असता महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरची त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावर आदळल्याने संदेश बुटाला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी संदेश बुटाला यांना तात्काळ नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल कराण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दुचाकीला धडक दिल्यानंतर कंटेनर चालक न थांबत अपघातस्थळावरून सुसाट वेगाने गोवा दिशेकडे निघून गेला. मात्र लोटे औद्योगिक परिसरात पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला अडवण्यात यश आले. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम, ठिकठिकाणी खड्ड्यात गेलेला रस्ता, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याची न राखलेली लेव्हल यामुळे मुंबई गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होऊ लागला आहे.
खेड पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.