ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या भावस भावाच्या इनोव्हा कारला अपघात झाला. या अपघातात अंबादास हरिश्चंद्र नरवणे या भुमरेंच्या मावस भावाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन जण जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नरवणे आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन पुण्याच्या दिशेने निघाले होते. कामशेतजवळ त्यांच्या भरधाव वेगातील इनोव्हा कारने पुढे चालत असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार रस्ता दुभाजकावर आदळली. यात नरवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक आणि नरवणे यांचा मित्र या अपघातात जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
अधिक वाचा : PM मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट, अलर्ट जारी
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच या अपघाताचा तपास सुरू केला आहे. नरवणे हे औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या निधनाने पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.