Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाच्या अँड्रय़ू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Advertisements

शनिवारी रात्री कार अपघातात झाले निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रय़ू सायमंड्सचे एका कार अपघातात दुःखद निधन झाल्याने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या मार्चपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटला बसलेला ही तिसरा धक्का आहे. मार्चमध्ये महान फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन झाल्यानंतर माजी यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांचेही त्यानंतर काही तासातच निधन झाले होते. निधनसमयी सायमंड्स 46 वर्षांचा होता. त्याच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

क्वीन्सलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियाच्या उत्तरपूर्व भागातील टाऊन्सव्हिलेपासून 50 किमी अंतरावर असणाऱया हेर्वे रेंज रोड येथे झालेल्या अपघातात सायमंड्सचे निधन झाले. या कारमध्ये तो एकटाच होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, हेर्वे रेंज रोडवर ऍलाईस नदीवरील ब्रिजवर रात्री 11 वाजता कार चालली असताना ती अचानक रस्त्याकडेला पलटी झाली. सायमंड्स एकटाच गाडी चालवत होता. आपत्कालीन दल तात्काळ तेथे दाखल झाले आणि त्यांनी त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे तो जागीच मृत पावला होता.’

क्रिकेट कारकिर्दीत तो आक्रमक फलंदाज आणि मध्यमगती व फिरकी गोलदांजी करणारा तसेच दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जात होता. 1998 ते 2009 या कालावधीत त्याने ऑस्ट्रेलियातर्फे 26 कसोटी, 198 वनडे व 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले होते. 2000 च्या दशकात तो ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा नियमित व महत्त्वाचा सदस्य होता. ‘ऑस्ट्रेलियाने आपल्या आणखी एका सर्वोत्तम खेळाडूला गमावले आहे,’ अशी भावना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन लॅचलन हेन्डरसन यांनी व्यक्त केली. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू होता. विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या यशात तसेच क्वीन्सलँडच्या समृद्ध क्रिकेट इतिहासात त्याने मोलाची व महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही ते म्हणाले. 

क्रिकेटमधील संस्मरणीय क्षण

2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने केलेली शतकी खेळी संस्मरणीय ठरली. 4 बाद 86 अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती असताना तो मैदानात उतरला आणि 125 चेंडूत 18 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 143 धावा फटकावत संघाला 8 बाद 310 धावांची मजल मारून दिली. त्याचे हे वनडेतील पहिलेच शतक होते. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आणि नंतर वर्ल्ड कपही जिंकला. त्यानंतर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाचाही तो सदस्य होता. वनडे कारकिर्दीत त्याने 5088 धावा जमविताना 6 शतके नोंदवली. टी-20 मध्ये त्याने 48.14 च्या सरासरीने धावा जमविल्या. याशिवाय आयपीएलमध्ये त्याने डेक्कन चार्जर्स व मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. चार्जर्सकडून खेळताना त्याने 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 53 चेंडूत नाबाद 117 धावा फटकावल्या होत्या. 2004 मध्ये लंकेविरुद्धच्या कसोटीसाठी निवडल्यावर त्याने 2 शतके, 10 अर्धशतकांसह 1462 धावा जमविल्या.

2006-07 मधील बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडविरुद्ध त्याने 156 धावांची खेळी केली तर 2008 मध्ये सिडनीत भारताविरुद्ध झालेल्या कसोटीत त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च 162 धावांची खेळी केली होती. पण ही कसोटी गाजली ती सायमंड्स व हरभजन सिंग यांच्यातील वादग्रस्त मंकीगेट प्रकरणाने. हरभजनने आपल्यावर वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याचा त्याचा आरोप होता, पण भज्जीने त्याचा इन्कार केला. हे प्रकरण विकोपाला गेल्यानंतर भज्जीवर 3 सामन्यांची बंदी घातली होती. पण भारताने दौरा अर्धवट सोडण्याची धमकी दिल्यानंतर त्यात कपात करण्यात आली होती. या प्रकरणानंतर सायमंड्सच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती.

सहकाऱयांत रॉय या नावाने ओळखला जाणाऱया सायमंड्सबाबत आणखी काही वादग्रस्त प्रकरणे आहेत. 2005 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन वनडे सामन्यातून त्याला डच्चू देण्यात आला होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी मद्यपान करून आल्याने त्याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. तीन वर्षानंतर संघाच्या बैठकीला उपस्थित न राहता तो डार्विनमध्ये मासेमारी करण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्याला ताबडतोब घरी पाठवण्यात आले. 2009 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेआधीही त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करताना संघातून डच्चू देत मायदेशी पाठवण्यात आले होते. नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला मध्यवर्ती करारातूनही मुक्त केले. यामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आली.

मैदानाबाहेरील वादग्रस्त घटना सोडल्यास मैदानावरील त्याची कामगिरी दर्जेदार झाली होती. 2004 मध्ये इंग्लिश कौंटी सरेकडून खेळताना केवळ 34 चेंडूत शतक नोंदवले होते. कौंटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार नोंदवण्याचा संयुक्त विक्रमही त्याच्या नावावर होता. 1995 मध्ये ग्लॅमर्गनविरुद्ध ग्लुसेस्टरशायरसाठी खेळताना त्याने 16 षटकार ठोकले होते. 27 वर्षांनंतर याच महिन्यात हा विक्रम बेन स्टोक्सने मोडताना 18 षटकार नोंदवले. 2012 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आणि मायदेशात होणाऱया सामन्यांचे तसेच बिग बॅश लीगमध्ये त्याने समालोचनाचे काम सुरू केले होते.

क्रिकेट क्वीन्सलँडचे चेअरमन ख्रिस सिम्पसन यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांत्वना दिली असून सर्वतोपरी साहय़ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्या जाण्याने जी उणीव निर्माण झाली आहे, ती आम्हा सर्वांनाच जाणवत राहणार आहे. त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर जो ठसा उमटवलाय तो कधीही विसरता येणार नाही, अशा भावनांही त्यांनी व्यक्त केल्या.

बॉक्स

श्रद्धांजली

अनेक आजी व माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून या वृत्ताने अनेकांनी धक्का बसल्याचे म्हटले आहे. त्याचे माजी सहकारी ऍडम गिलख्रिस्ट, जेसन गिलेस्पी, मायकेल बेव्हन, भारताचे हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर, माजी खेळाडू व प्रशिक्षक डॅरेन लीमन, डॅमियन फ्लेमिंग, अनिल कुंबळे, शोएब अख्तर, अफगाणचा रशिद खान यांचा समावेश आहे. याशिवाय बॉलीवूडमधील संजय दत्तसह अन्य काही कलाकारांनीही दुःख व्यक्त केले आहे.

‘या वृत्ताने खूप दुखी झालोय. काहीही करण्यास तयार असणाऱया या प्रेमळ मित्राच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि वेदना देणारे आहे.’

-गिलख्रिस्ट

सकाळी उठल्या उठल्याच मिळालेल्या या वृत्ताने मी पूर्णपण हादरून गेलो. मित्रा, तुझी उणीव आम्हाला सतत जाणवत राहील.

-गिलेस्पी

मन विषण्ण करणारे वृत्त. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने आणखी एक हिरो गमावला. अतिशय प्रतिभावान खेळाडू होता.

-मायकेल बेव्हन

सायमंड्सच्या आकस्मिक निधनाचे वृत्त खूप धक्कादायक आहे. निघण्याची खूप घाई झाली. त्याच्या कुटुंबियांच्या तसेच मित्रमंडळींच्या दुखात सहभागी आहे.

-हरभजन सिंग

सायमंड्सच्या अनपेक्षित जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसलाय. त्यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय. तो उत्कृष्ट अष्टपैलू आणि मैदानावर चैतन्याचा झरा होता. मुंबई इंडियन्समध्ये असताना त्याच्याबरोबरच्या अनेक आनंददायक आठवणी आहेत. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबीय व मित्रांचे सांत्वन.

-सचिन तेंडुलकर

Related Stories

रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडशी करारबद्ध

Patil_p

अफगाणविरुद्ध झिम्बाब्वेचा एकतर्फी विजय

Patil_p

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात

Patil_p

हेन्स, बाबर आझम मार्चमधील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

राष्ट्रकुलसाठी साजन प्रकाश, श्रीहरी नटराजवर मुख्य भिस्त

Patil_p

रामकुमारचे आव्हान समाप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!