सखोल चौकशी करण्याचे तेथील प्रशासनाचे आश्वासन
@ टोरँटो / वृत्तसंस्था
हरियाणा राज्यातील कर्नाळ येथील रहिवासी आणि सध्या कॅनडा देशातील शेरीडन महाविद्यालायात शिकत असलेला विद्यार्थी कार्तिक सैनी याचा भीषण अपघातात ट्रकखाली सापडून मृत्यू झाल्याने तेथील भारतीय समाज संतप्त झाला आहे. हा अपघात मुद्दाम घडवून आणला आहे का, याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. ट्रकखाली आल्यानंतर हा विद्यार्थी अनेक मीटर अंतर फरफटत गेला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
शेरीडन महाविद्यालयाने हा विद्यार्थी आपलाच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कार्तिक याचा चुलत भाऊ प्रवीण याने हे वृत्त भारतात राहणाऱया त्याच्या आईवडिलांना कळविले. त्यामुळे त्यांना ही माहिती समजली. कॅनडा सरकार त्याचा मृतदेह भारतात पाठवेल अशी अपेक्षा त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केली.
हा अपघात बुधवारी झाल्याची माहिती देण्यात आली. कार्तिक हा सायकलवरुन महामार्ग ओलांडत असताना मार्गाच्या एका बाजूने भरधाव आलेल्या ट्रकखाली सापडला. त्याची सायकल ट्रकच्या एका भागात अडकल्याने तो मोठे अंतर फरफटत केला. ट्रक वेगात असल्याने तो थांबविण्यासाठी चालकाला वेळ लागला. तेथील रहदारी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्याचा मृत्यू मार्गावरच झाला होता, असे स्पष्ट करण्यात आले.
आरोप सादर होण्यास वेळ लागणार
या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यानंतरच आरोप सादर होतील, असे तेथील पोलिसांनी स्पष्ट केले. सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जाणार आहे. प्रथमदर्शनी हा अपघातच असल्याचे दिसत आहे. मात्र, घातपाताची शक्यताही पडताळली जाणार आहे. कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही विद्यार्थ्यांचा हत्याही झाल्या आहेत. त्यामुळे सर्व शक्यतांचा तपास केला जाईल. त्यानंतर ट्रक चालकावर आरोप सादर होतील. यासाठी एक दोन आठवडय़ांचा वेळ लागू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.