Tarun Bharat

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Advertisements

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, मराठा आरक्षणाचा आवाज हरपला

प्रतिनिधी/ मुंबई
मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, जगाला हेवा वाटावा असे शिवस्मारक व्हावे, यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (वय 52) यांच्या गाडीला भीषण अपघात होवून यात मेटे यांचे निधन झाले आहे. विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे रूग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहेत. अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरक्षः चक्काचूर झाला आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत बैठक
याबाबत अधिक माहिती अशी, मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी विनायक मेटे हे आपल्या (एमएच- 01 डीपी- 6364) या फोर्ड इन्डेव्हेयर गाडीने चालक एकनाथ कदम यांच्यासह मुंबईकडे चालले होते. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल ते खालापूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ पहाटे 5ः05 वाजता दुसऱया लेनने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱया गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली.
या अपघातात आमदार विनायक मेटे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. धर्मांग यांनी तपातणी करून त्यांना मयत घोषित केले केले. मेटे यांचे सुरक्षा रक्षक पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने त्यांना कारमधून बाहेर काढून त्यांना देखील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तासभर मदत नाही
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. 100 नंबरला आम्ही फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो. मात्र, कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाडय़ांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथे रुग्णवाहिका आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आले नसल्याचे कदम यांनी सांगितले. मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून हा अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येते.


मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमजीएम रूग्णालयात धाव घेतली. हा अपघात झालाय की घातपात झाला, याबाबतची चौकशी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली होती. त्यानंतर रूग्णालयात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची चौकशी केली जाईल, असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच, विनायक मेटेंच्या सहकाऱयाने घटनास्थळी वेळेवर मदत पोहचली नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल. संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल.
शिंदे म्हणाले, आज आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण दुर्दैवाने विनायक मेटे .यांच्या निधनाचे वफत्त समोर आले. या निधनामुळे विनायक मेटेंच्या कुटुंबीयांवर दुरूखाचा डोंगर कोसळला आहे. सरकार त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

चौकशीसाठी ड्रायव्हर ताब्यात
विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल काही नेत्यांनी तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातात विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला किरकोळ जखम झाली आहे. अपघाताबाबत अधिक माहितीसाठी नवी मुंबई पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला आता रसायनी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अपघाताबाबत एकनाथ कदम याच्याकडून सविस्तर माहिती पोलिस घेतील. अपघात झाला तेथील सीसी टीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत.

अपघात नेमका कसा घडला ?
विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदमने दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकने भरधाव वेगेत कारला हुल दिल्यामुळे हा अपघात घडला. कदम याने सांगितले, आम्ही बीडवरून मुंबईला जात होतो. रस्त्यात एका ट्रकने आम्हाला हुल दिली. या ट्रकच्या बंपरमध्ये आमची कार अडकली. त्याच स्थितीत कार काही अंतरापर्यंत फरफटत गेली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. पण मदत पोहोचण्यासाठी तासभर लागला. मी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी 6 च्या सुमारास रुग्णवाहिका आमच्यापर्यंत पोहोचली.

रात्री सव्वादोन वाजता मेसेज
विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज पाठवल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. “काल रात्री सव्वादोन वाजता त्यांनी मला मेसेज केला की ‘मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बैठक बोलावली आहे, त्यासाठी मी येतोय. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो’ असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. मी आज सकाळी तो मेसेज वाचला’’, असे फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अपघात की घातपात झाला जाहीर करावे
मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. मात्र या दरम्यान मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातानंतर दोन तास कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा अपघात झालाय की घातपात झाला, हे सरकारने तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली.
बीड येथे आज अंत्यसंस्कार
बीड ही विनायक मेटे यांची कर्मभूमी होती. तिथे मेटे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी शिवसंग्राम भवनावर गर्दी केली. कार्यकर्त्यांमध्ये शोककला पसरली आहे. अंतिम दर्शनासाठी विनायक मेटे यांचे पार्थिव रविवारी दुपारी एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईहून बीडला नेण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे मुंबई अध्यक्ष राजन घाग यांनी दिली.
राजकीय कारकीर्द
1986 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी काम सुरू केले. 1995 मध्ये त्यांनी मराठवाडा लोकविकास मंचची स्थापना तर 1998 मध्ये नव महाराष्ट्र विकास पार्टीची स्थापना केली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम तर 2002 मध्ये शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. विधीमंडळाची कारकिर्द पहाता 31 जानेवारी 1996 ते 20 एप्रिल 2000 या काळात ते पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले. तर 28 जुलै 2000 पासुन ते 7 जुलै 2022 पर्यंत असे सलग पाच टर्म विधानपरीषद सदस्य होते.

Related Stories

जनतेची दिशाभूल करू नका

Patil_p

२९ जून सांख्यिकी दिवस म्हणून साजरा

Nilkanth Sonar

सर्व्हायकल कॅन्सरविरोधी लढय़ाला बळ

Patil_p

‘लष्कर-ए-तोयबा’च्या मॉड्य़ूलचा पर्दाफाश

Amit Kulkarni

123 प्रवाशांसह विमानाचे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग

Patil_p

भारतीय पेट्रोकंपनीविरुद्ध अमेरिकेचे निर्बंध

Patil_p
error: Content is protected !!