अधिकाऱयांकडून जाणून घेतल्या समस्या
प्रतिनिधी /म्हापसा
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी बुधवारी सकाळी बार्देश मामलेदार कचेरीत आकस्मिक भेट देऊन येथील कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी व मामलेदारांशी संवाद साधून त्यांच्याकडून कामकाजाची माहिती जाणून घेतली.
येथील कार्यालयात कोर्ट आहे मात्र तेथे उभे राहण्यासाठी जागा नाही. प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे सरकारने तडीस लावावीत. यासाठी येथील मामलेदारांनी त्या प्रकरणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत महसूल मंत्र्यांशी आपण बोलणी करणार असून त्यांच्याबरोबर बार्देश तालुक्यातील सर्व आमदारांना एकत्रित बोलावून यावर तोडगा काढणार असल्याचे मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपण मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनेक तक्रारी समोर आल्या असून त्या कशा पद्धतीने जलद सोडविता येतील याकडे लक्ष देणार आहे. आपण प्रत्येक तालुक्यात जाऊन किती मुंडकार केसेस अद्याप बाकी आहेत याची माहिती घेणार आहे. तसेच येथील सबरजिस्टरमध्ये लिफ्ट बंद असून पाणी, शौचालयाची समस्या आहे, असे लोबो यांनी सांगितले.