Tarun Bharat

दिल्लीतील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

दिल्लीच्या कंझावला येथे युवतीचा मृत्यू ः शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीच्या कंझावला येथील घटनेने देशाला हादरवून सोडले आहे. कारद्वारे फरफटत गेल्याने युवतीचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलीस या पूर्ण घटनेला रस्ते अपघात संबोधित आहे, तर युवतीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली असून सोमवारी न्यायालयाकडून त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी पोलिसांकडून त्वरित एक विस्तृत अहवाल मागविला आहे.

पोलीस आता आरोपींची चौकशी करत या घटनेमागील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीच्या कंझावला भागात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या मृतदेहावर कपडय़ाचा एक तुकडाही शिल्लक नव्हता. तसेच नजीकच एक दुर्घटनाग्रस्त स्कुटी हस्तगत करण्यात आली होती.

5 युवक मद्याच्या नशेत कारने प्रवास करत असताना 20 वर्षीय युवतीच्या स्कुटीला धडक बसली होती. दुर्घटनेनंतर युवकांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला असता युवती कारच्या चाकात अडकून पडली होती. आरोपींनी तशाही स्थितीत कार सुमारे 8 किलोमीटरपर्यंत पुढे नेल्याने युवतीचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. मृत युवतीचे नाव अंजली सिंह असून ती इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करत कार हस्तगत केली आहे.

कुटुंबीयांकडून संशय व्यक्त

पोलिसांच्या कारवाईशी आम्ही सहमत नाही. हे प्रकरण निर्भयाशी मिळतेजुळते आहे. अंजलीचा मृतदेह एकेठिकाणी तर स्कुटी दुसऱया ठिकाणी आढळून आली आहे. दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत. एवढी मोठी घटना रस्त्यावर घडूनही पोलिसांना कळले नाही. तसेच कुटुंबीयांना घटनास्थळी नेण्यात आले नसल्याचे म्हणत मृत युवतीच्या नातेवाईकांनी तपासाबद्दल संशय व्यक्त केला आहे.

पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने

आरोपींना वाचविण्याचा आरोप पोलीस करत असल्याचे म्हणत स्थानिक लोकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून निदर्शने केली आहेत. आरोपींवर हत्या आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची मागणी जमावाने केली आहे. तर शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच स्थिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांची उपराज्यपालांशी चर्चा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी याप्रकरणी उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याशी चर्चा केली आहे. कंझावला येथील घटनेला भयावह ठरवत केजरीवालांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणार असल्याचे म्हटले आहे. आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित असले तरीही त्यांना मोकळे सोडले जाणार नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. तर उपराज्यपाल सक्सेना यांनी या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. कंझावला येथे घडलेल्या घटनेतील गुन्हेगारांच्या राक्षसी वृत्तीच्या संवेदनहीनतेमुळे धक्का बसल्याचे सक्सेना यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पाचारण करत विस्तृत अहवाल मागविला आहे.

Related Stories

देशात मागील 6 महिन्यातील निच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

गोरखपूमध्ये चंद्रशेखर आझादांचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी

Patil_p

कोरोना बळींच्या कुटुंबीयांना तत्काळ भरपाई द्या

Patil_p

राहुल गांधींनी घेतला नौका शर्यतीत भाग

Patil_p

वाणिज्य भवन, निर्यात पोर्टलचे अनावरण

Amit Kulkarni