ऑनलाईन टीम / अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये (achalpoor) झेंडा लावण्यावरुन दोन गटात तूफान राडा (Flag Hoisting Rada) झाला. याप्रकरणी आज सकाळी 9 वाजेपर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचलपुरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, अचलपूर आणि परतवाडा शहरात संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.
रविवारी रात्री अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर (Dulha Gate) झेंडा फडकवल्यामुळे दोन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. जमावाने पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. पोलीस बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या तीन तुकडय़ा घटनास्थळी दाखल आहेत. अमरावती ग्रामीणचे 150 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी, तसेच अकोला येथील 100 अधिकारी आणि पोलिसांचा ताफाही घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
सध्या अचलपूरमधील परिस्थिती नियंत्रणात असून, अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.