बहिणींनी व्यक्त केल्या भावाबद्दलच्या भावना : बेळगावची व्यक्ती अमेरिकेत खासदारपदी निवडून येणे विशेष बाब
मनीषा सुभेदार / बेळगाव
बेळगावच्या शहापूर परिसरातील मीरापूर गल्लीतील आमच्या श्रीचा लोकल ते ग्लोबल हा प्रवास कष्टाचा आणि धडपडीचा आहे. आज आमचा भाऊ अमेरिकेमध्ये खासदार म्हणून विजयी झाला आहे. याचा आम्हाला आनंद झाला आहे आणि त्याहीपेक्षा आम्हाला त्याच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. या भावना श्री ठाणेदार यांच्या बहीण वेदा उर्फ विद्या कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
श्री ठाणेदार यांच्या निवडणूक विजयानंतर तरुण भारतने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, शहापूरच्या मीरापूर गल्लीत आम्ही आई-वडील, पाच बहिणी, दोन भाऊ राहत होतो. आमचे घर साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातले. वडिलांचे लवकर निधन झाल्यानंतर श्रीने शिक्षण करत करत नोकरीही केली. पुढे तो अमेरिकेपर्यंत कसा पोहोचला हे सर्वश्रुतच आहे. मात्र, त्याचा बेळगाव ते अमेरिका हा प्रवास अत्यंत कष्टाचा आणि जिद्दीचा होता हे नक्की.
श्री अतिशय कनवाळू
आम्हाला त्याने पहिल्यापासूनच आधार दिला आहे. श्रीच्या स्वभावाचा सर्वात महत्त्वाचा आणि अनुकरणीय पैलू म्हणजे तो अतिशय कनवाळू आहे. त्याला प्रत्येकाबद्दल आपुलकी वाटते. शक्मय तेवढी मदत इतरांना करावी, हा त्याचा स्वभाव आहे. कदाचीत त्याच्या विजयाचे हे ही एक कारण असू शकेल.
अमेरिकेत त्याने उद्योग सुरू केला. मध्यंतरी त्याच्या उद्योगाला फटकाही बसला. पण न डगमगता एक एक कंपनी घेत तो उच्च पदावर पोहोचला. मी अमेरिकेत आहे आणि येथील पैसा येथील लोकांसाठीच वापरणार, असे तो म्हणतो. मुख्य म्हणजे त्याला महिलांच्या क्षेत्रात काम करून त्यांना मदत करावयाची आहे, हे विशेष.
विजयानंतर त्यांच्या आणि तुमच्या भावना काय आहेत? या प्रश्नावर विद्या म्हणाल्या, मी तसेच वीणा आणि वंदना या माझ्या दोन बहिणी आणि भाऊ यांना अतिशय आनंद झाला आहे. आज दोन बहिणी हयात नाहीत. त्यांची आम्हाला आठवण येते. श्रीला अभिनंदनासाठी फोन केला, तेव्हा त्यानेही त्यांची आठवण काढली.
शिक्षण पद्धतीत सुधारणा करणार
श्रीच्या मते बेळगावचा एक साधा मुलगा अमेरिकेत निवडून येणे ही खरोखरच विशेष बाब आहे. कारण वयाच्या 24 व्या वषी तो अमेरिकेत गेला. तो भारतीय आहे हे प्रथमदर्शनीच कळते. त्यामुळे हा आपल्यासारखा बोलू शकत नाही, त्यांना आपले प्रश्न काय कळणार? अशीच तेथील मतदारांची भावना असते. परंतु श्री प्रत्येकाच्या घरी गेला आणि मला शिक्षण पद्धतीत सुधारणा करून गुन्हेगारी कमी करावयाची आहे, असे त्याने सांगितले. शिवाय एक काळ असा होता की, त्याने गरिबीत दिवस काढले आहेत. त्यामुळे तुमचे व माझे प्रश्न वेगळे नाहीत हे त्याने मतदारांना पटवून दिले आणि त्यामुळेच तो तेथे विजयी झाला आहे.
विश्वास सार्थ ठरवणार…
श्री ठाणेदार हे अमेरिकेच्या मिशीगन राज्यात डेमोक्रॅटिक पक्षातून विजयी झाले आहेत. त्यांना 93 टक्के मते मिळाली आहेत. ते अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये अमेरिकन लोकांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. श्री यांच्या मते आता अमेरिकन लोकांना भारतीय डॉक्टर आणि इंजिनिअर चालतात. मात्र, राजकारणी चालत नाहीत. तथापि, माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला निवडून दिले आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे.